मॅडम,सरांनाही यावं लागणार गणवेशात!शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

मालेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षकांसाठी गणवेशाची संकल्पना मांडली. डॉक्टर आणि वकिलांप्रमाणेच शिक्षकांचा सुद्धा एक खास पोशाख असावा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मात्र, ‘एक राज्य, एक गणवेश’ ही सक्ती न करता, प्रत्येक शाळेने आपल्या पातळीवर शिक्षकांसाठी एकसमान गणवेश ठरवावा, असा सल्ला त्यांनी दिला.या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकांनी एकसारखी साडी नेसली होती. त्यातील एकरूपता पाहून प्रभावित झालेल्या दादा भुसे यांनी, “शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर एकसमानतेचा आदर्श ठेवावा. त्यातून त्यांच्यातील एकजूट आणि शिस्त दिसून येते,” असे सांगितले. राज्यभर एकच गणवेश नको, पण शाळेच्या स्तरावर शिक्षकांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा आणि एक गणवेश निश्चित करावा,” अशी भुसे यांची भूमिका होती.ज्याप्रमाणे डॉक्टर, वकील यांना समाजात त्यांच्या गणवेशावरून लोक ओळखतात आणि मान देतात, तसाच मान शिक्षकांना त्यांच्या शाळेच्या गावात गणवेशामुळे मिळावा, अशी अपेक्षाही दादा भुसे यांनी व्यक्त केली. त्यांचा उद्देश शिक्षकांनाही समाजात ओळख मिळावी, त्यांचाही एक विशिष्ट दर्जा तयार व्हावा, हाच आहे.मात्र या प्रस्तावावर शिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षक सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटोळे यांनी विचारले की,जेव्हा शिक्षकांसाठी आधीच वस्त्रसंहिता लागू आहे, तर वेगळ्या गणवेशाची गरजच काय?” त्यांनी हेही अधोरेखित केले की, प्रत्येक शिक्षकाची शारीरिक सोय आणि रूचीनुसार पोशाख असायला हवा. “सर्व शिक्षिकांना साडी परिधान करणं सोयीचं असेलच असं नाही, तर पुरुष शिक्षकांना सुद्धा अर्ध्या की पूर्ण बाह्यांचे शर्ट याबाबत स्वतंत्र निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं,” असं त्यांनी नमूद केलं.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *