रेणापूर नगरपंचायतीत ठाकरे गटाला मोठा धक्का; ११ उमेदवारांची ऐनवेळी माघार, राजकारणात खळबळ

लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)ला मोठा धक्का बसला आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसह पक्षाचे तब्बल १६ पैकी ११ उमेदवारांनी निवडणुकीच्या तोंडावर माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याची नाराजी या उमेदवारांनी व्यक्त केली. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी पूर्ण ताकदीने लढण्याचे आदेश दिले असतानाही पक्षांतर्गत अडथळ्यांमुळे माघार घेण्याची वेळ आल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

२०१६ मध्ये स्थापन झालेल्या रेणापूर नगरपंचायतीत २०१७ च्या पहिल्या निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. चालू निवडणुकीत भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) असा चौरंगी सामना अपेक्षित होता. मात्र ठाकरे गटातील ११ उमेदवारांच्या माघारीनंतर निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.

माघार घेतलेल्या उमेदवारांमध्ये नगराध्यक्षपदाच्या ललिता बंजारा यांच्यासह अनुसया कोल्हे, महेश व्यवहारे, गोविंद सुरवसे, रेखा शिंदे, रेहानबी कुरेशी, छाया आकनगीरे, राजन हाके, धोंडीराम चव्हाण, शांताबाई चव्हाण आणि बाबाराव ठावरे यांचा समावेश आहे.

या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आहे की काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी भाजपला रोखण्यासाठी ठाकरे गटाला कमकुवत केले असून उमेदवारांना माघारीसाठी प्रवृत्त करण्यात काँग्रेसचा हात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. ११ उमेदवारांच्या माघारीमुळे आता मैदानातील संघर्षाचे समीकरण पूर्णपणे बदलले असून कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *