पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ; १२६१ नावे गायब

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर अनियमितता उघड झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रभाग क्रमांक १२ मधील तब्बल १२६१ मतदारांची संपूर्ण यादीच गायब झाली असून, ही नावे चुकीने प्रभाग १ मध्ये टाकल्याचे समोर आले आहे. या गायब यादीत राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पंकज भालेकर यांचे स्वतःचे नावही आहे, त्यामुळे त्यांनी या गोंधळावर गंभीर आरोप केले आहेत.

भालेकर यांनी २०२४ च्या विधानसभा मतदार यादी आणि आत्ताच्या यादीतील मोठा फरक दाखवत निवडणूक विभागावर पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. “मी प्रभाग १२ मधून निवडणूक लढण्यास इच्छुक असताना माझी आणि माझ्या समर्थकांची नावेच गायब होतात, यामागे भाजपचा हात असल्याचा संशय आहे,” असे भालेकर म्हणाले. २०१७ च्या निवडणुकीत ते १८०० मतांनी विजयी झाले होते, त्यातील १२०० मतांचे लीड कमी करण्याचा हा राजकीय डाव असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.

फक्त प्रभाग १२ नव्हे, तर अनेक प्रभागांमध्ये चुकीची नावे, गायब नोंदी आणि विनाकारण इतर प्रभागात टाकलेले मतदार अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. महापालिकेला पहिल्याच दिवशी १७ हरकती प्राप्त झाल्या. प्रभाग ६ मधील मोशी व कुदळवाडी येथील मतदारांची नावे चुकीने घातली गेली, तर प्रभाग १६ मधील काही नावे प्रभाग १७ मध्ये गेल्याचेही निदर्शनास आले. चिखलीतील पूर्णानगर, कृष्णानगर, घरकुल परिसरातील मतदारांना प्रभाग ११ मध्ये टाकल्याची चर्चा असून त्यामुळे प्रभाग १ मधील मतदारसंख्या तब्बल ७४,३४० वर गेल्याचे सांगितले जाते.

योगिता रणसुभे यांच्यासह अनेक नागरिकांची नावे चुकीने हलवण्यात आल्याने नाराजी व्यक्त झाली असून, “प्रत्यक्ष पडताळणी न केल्याचा हा परिणाम आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विनायक रणसुभे यांनी दिली. प्रारूप मतदार यादीतील या गोंधळामुळे आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *