बिहारचा ‘जल योद्धा’ : अंध असूनही १३ जणांना बुडण्यापासून वाचवले!

बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातील दुमदुमा गावातील भुल्लू साहनी हे नाव आजकाल जिल्ह्यात नव्हे तर देशात दुमदुमत आहे. कारण, जन्मापासून अंध असलेले भुल्लू यांनी आपल्या शौर्याने आणि मानवतावादी वृत्तीने अनेकांचे प्राण वाचवले आहेत.भुल्लू यांनी आजवर गंगा, बूढ़ी गंडक, बागमती यांसारख्या नद्यांमध्ये बुडालेले १३ लोक वाचवले आहेत. आणि त्यांनी नदीत बुडलेल्यांचे १४ मृतदेह बाहेर काढले आहेत. या कामगिरीमुळे त्यांना ‘जल योद्धा’ असे संबोधले जात आहे.

भुल्लू साहनी यांचे वडील कैलू साहनी यांनी त्यांना लहानपणापासूनच पोहणे आणि मासेमारी शिकवले होते. कालांतराने, भुल्लू यांनी पोहण्यावर प्रभुत्व मिळवले आणि ही कला त्यांच्यासाठी जीवन वाचवण्याचे साधन बनली. बिहारमधील “मल्ला” समुदायातून आलेले भुल्लू, नदीच्या किनाऱ्यावर वाढले आहेत. त्यांचे अद्वितीय पोहण्याचे तंत्र आणि निर्भय दृष्टीकोन यामुळे संकटात सापडलेले लोक त्यांच्याकडे मदतीसाठी धावून जातात.
आपल्या या कामासंदर्भात भुल्लू साहनी म्हणतात, “मी आंधळा असलो तरी, पाण्यात प्रवेश केल्यावर मला हरवलेली व्यक्ती शोधण्याची एक विशेष क्षमता जाणवते. पाण्याखाली काहीतरी चमकत असल्यासारखे वाटते आणि मी त्या दिशेने धावून जातो.”

भुल्लू हे गावकऱ्यांना स्थानिक उत्पादने विकून जगतात. जेव्हा ते कोणत्याही गावकऱ्याला वाचवतात किंवा पाणवठ्यातून मृतदेह बाहेर काढतात तेव्हा त्यांना 1500 ते 2000 रुपये पर्यंत बक्षीस मिळते. चकसाहो पंचायतीच्या मुखिया जागो देवी यांनी सांगितले की, भुल्लू साहनी यांच्या दुर्मिळ कौशल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र, अद्याप त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळालेली नाही.

भुल्लू साहनी यांचे आयुष्य हे असे एक उदाहरण आहे की, अंधत्व ही त्यांच्यासाठी अडचण नाही. इच्छाशक्ती आणि परिश्रम असल्यास आपण कोणतेही अशक्य काम करू शकतो. भुल्लू साहनी यांसारख्या व्यक्तींमुळे मानवता अजूनही जिवंत आहे हे सिद्ध होते.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *