बॉस्टन : तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर झपाट्याने वाढत आहे. विशेषतः जनरेटिव्ह एआय टूल्स जसे की चॅटजीपीटी आणि कोपायलट यांच्याकडे कंपन्यांनी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, इतकी प्रचंड गुंतवणूक करूनही या साधनांचा कंपन्यांच्या नफ्यावर थेट परिणाम झालेला नाही, असा धक्कादायक निष्कर्ष मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी)च्या स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटच्या अभ्यासातून समोर आला आहे. अभ्यासात नमूद केले आहे की, नवोदित कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची गती व कार्यक्षमता वाढली असली, तरी कंपन्यांच्या एकूण उत्पन्नात अपेक्षित वाढ झालेली नाही. अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर तर जनरेटिव्ह एआयचा परिणाम अत्यल्प आहे. विशेष कौशल्याची गरज असलेल्या कामांसाठी अजूनही त्यांना स्वतंत्रपणे काम करावे लागत आहे.
एमआयटीच्या या अभ्यासात सहभागी झालेल्या सुमारे ७५ टक्के कंपन्यांनी मान्य केले की, जनरेटिव्ह एआयच्या वापरानंतर आर्थिकदृष्ट्या कुठलाही लक्षणीय बदल झालेला नाही. या टूल्सचा वापर मुख्यतः ग्राहक सेवा, डेटा एंट्री आणि लिखाण अशा कामांसाठी झाला; पण उत्पन्नवाढ मात्र झाली नाही. अभ्यासाचे प्रमुख संशोधक एरिक ब्रायनजॉल्फसन यांनी स्पष्ट केले की, “जनरेटिव्ह एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे. मात्र त्याचा वापर केवळ कामाचा वेग वाढवण्यासाठी नव्हे, तर नफा वाढवण्यासाठी कसा करता येईल, यावर कंपन्यांनी विचार करणे आवश्यक आहे.”तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एआय साधने ही जादूची कांडी नसून त्यांचा योग्य धोरणात्मक वापर केल्याशिवाय उद्योगजगताला अपेक्षित फायदा होणार नाही. त्यामुळे कंपन्यांनी केवळ गुंतवणुकीवर अवलंबून न राहता एआयचा नफा वाढवणाऱ्या नवकल्पनांमध्ये वापर कसा करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.
Leave a Reply