भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे कॉल; तुकाराम मुंढे प्रकरण तापले

सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कारवाईची मागणी करत हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याची तयारी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्याकडून सुरू असतानाच, या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर निलंबनाची मागणी करणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना दोन अज्ञात व्यक्तींनी फोनवरून धमक्या दिल्याची माहिती समोर आली आहे. “तुम्ही मुंडेंविरुद्ध का बोलता? त्यांच्या निलंबनाची मागणी का करता?” अशा स्वरूपाचे प्रश्न विचारत शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या, असे खोपडे यांनी पोलिसांत नमूद केले आहे.

या घटनेनंतर खोपडे यांनी मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष कार्यालय, नागपूरचे पोलीस आयुक्त आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र तक्रारी दाखल केल्या असून, धमकी देणाऱ्या व्यक्तींचे नाव व दोन मोबाईल क्रमांकही पोलिसांना दिले आहेत. कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे.

तुकाराम मुंडे यांनी नागपूर स्मार्ट सिटीच्या कामकाजात नियमबाह्य हस्तक्षेप, आर्थिक गैरव्यवहार तसेच महिला अधिकाऱ्यांशी दुर्व्यवहार केल्याचा आरोप काही दिवसांपासून चर्चेत आहे. याच मुद्द्यांवर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी नोटीस देण्याची तयारी भाजप आमदारांकडून सुरू असल्याची माहिती एबीपी माझाने दिल्यानंतरच धमकीचे कॉल आल्याचे खोपडे यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून काँग्रेसही आक्रमक झाली आहे. आमदार नाना पटोले यांनी पार्थ पवार प्रकरणाची तुलना करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री खरोखरच पारदर्शक चौकशी करू इच्छित असतील, तर तुकाराम मुंडेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करावी,” असे आव्हान त्यांनी दिले. राज्यात सतत सुरू असलेली दिशाभूल आणि विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील समिती हा फक्त ‘फार्स’ असल्याचाही आरोप पटोले यांनी केला. मुंडे प्रकरणामुळे नागपूर अधिवेशन गाजण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *