आंध्र प्रदेश : राज्यसभेच्या जागेसाठी भाजपकडून संघाच्या जुन्या स्वयंसेवकाला संधी

आंध्र प्रदेशातील राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने अनेक मोठ्या नावांची चर्चा असतानाही, सरतेशेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते पाका वेंकट सत्यनारायण यांची उमेदवारी जाहीर केली आहे.भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्यनारायण हे पक्षाशी इमानदारीने जोडलेले असून, पक्षात त्यांनी अनेक पदांवर काम करत उच्च स्थान गाठले आहे. ते ओबीसी गोंड समाजातून येत असल्यामुळे, भाजपला यामार्फत मागासवर्गीयांमध्येही सकारात्मक संदेश पोहोचवायचा आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, “ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे आहेत, आणि पक्षाच्या विचारधारेत पारंगत आहेत. मागील दोन दशकांतील महत्त्वाच्या निवडणुकांसाठी त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्याच्या समित्यांमध्ये भूमिका बजावली आहे.

या जागेवरून आधी माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि अन्नामलाई कुप्पुसामी यांची नावं चर्चेत होती. ही जागा वायएसआर काँग्रेसचे वी. विजयसाई रेड्डी यांनीरिकामी केल्यानंतर निवडणूक होणार असून,९ मे रोजी मतदान होईल. कोणताही अन्य उमेदवार अर्ज न भरल्यास, सत्यनारायण यांची निवड निश्‍चित मानली जात आहे.भाजपच्या दुसऱ्या नेत्यानेही ही निवड उचित ठरवत सांगितले, ते कार्यकर्त्याच्या भूमिकेतून सुरुवात करून पक्षातील महत्त्वाच्या पदांपर्यंत पोहोचले आहेत. राज्यसभेत एक समंजस, अभ्यासू आवाज ठरेल.
सत्यनारायण यांनी 1976 मध्ये केवळ 15 व्या वर्षी RSSमध्ये प्रवेश केला. विद्यार्थी काळात ते ABVP (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) चे कार्यकर्ते होते आणि आंध्रातील डीएनआर कॉलेजमध्ये विद्यार्थी नेता म्हणून ओळखले जात होते. त्यांनी 1980 साली अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर टाउन जनरल सेक्रेटरी, जिल्हा सचिव, भीमावरमचे नगरसेवकआणि विधानसभेचे संयोजक अशा अनेक पदांवर काम केले.1996 मध्ये नरसापूरम लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र चौथ्या क्रमांकावर राहिले. 2006 मधील विधान परिषदेचे सदस्य निवडणुकीतही पराभव पत्करावा लागला. तरीही त्यांनी पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली आणि दीर्घकालीन योगदानामुळे पक्षात विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि अखेर आज त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *