भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष, १ जुलैला रवींद्र चव्हाण यांच्या नावाची होणार अधिकृत घोषणा

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी घडामोड घडणार आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री आणि विद्यमान कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निवड होणार असून, या पदासाठी केंद्रीय भाजपने केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. किरण रिजिजू हे ३० जून रोजी मुंबईत दाखल होतील आणि १ जुलै रोजी एका समारंभात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील. चव्हाण हे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची जागा घेतील. रवींद्र चव्हाण यांची जानेवारी २०२५ मध्ये प्रदेश कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नावाची चर्चा तेव्हापासूनच सुरू होती, विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २६ मे रोजी नांदेड येथील एका मेळाव्यात “भाजपचे भावी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण” असा उल्लेख केल्यामुळे या निवडीवर शिक्कामोर्तब झाले होते.

डोंबिवलीचे आमदार असलेले रवींद्र चव्हाण हे एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मात्र, गेल्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. तेव्हापासूनच ते नवे प्रदेशाध्यक्ष असतील अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. पूर्वीच्या फडणवीस सरकारमध्येही त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. भाजपच्या पक्षीय पद्धतीनुसार, प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज मागवले जातील. चव्हाण यांचा एकमेव अर्ज येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर १ जुलै रोजी मुंबईत त्यांच्या नावाची घोषणा होईल. त्यानंतर एका महिन्याच्या आत पक्षाचे अधिवेशन होईल, ज्यात चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल. हे अधिवेशन ठाणे येथे होण्याची शक्यता आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी १२ ऑगस्ट २०२२ रोजी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कार्यकाळात लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही, परंतु विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा विजय मिळाला होता.

राष्ट्रीय अध्यक्षांची निवडही लवकरच

महाराष्ट्रासह देशातील ५० टक्क्यांहून अधिक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होते. येत्या आठ ते दहा दिवसांत आणखी काही राज्यांचे प्रदेशाध्यक्ष निवडले जातील, आणि त्यानंतर जुलै महिन्यात नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बैठक ४, ५ आणि ६ जुलै रोजी दिल्लीत होणार आहे. या बैठकीत भाजप आणि संघ नेतृत्वादरम्यान चर्चा होऊन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *