शहापूर तालुक्यातील वाफेगाव परिसरात बुधवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. अंघोळीसाठी गेलेल्या तिघांचा भातसा नदीत बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये माय-लेकासह एक भाची यांचा समावेश असून, या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लक्ष्मी दत्तात्रय पाटील (वय ५०), त्यांचा मुलगा धीरज दत्तात्रय पाटील (वय १६) आणि भाची वनिता सुदर्शन शेळके (वय ३३) यांचा समावेश आहे. सकाळी १० च्या सुमारास चेरपोली गावातील लक्ष्मी व धीरज आणि वाफेगाव येथील वनिता अंघोळीसाठी भातसा नदीत गेले होते. मात्र, नदीकाठी असलेल्या खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले.
घटनेचे दृश्य पाहून स्थानिक रहिवाशांनी तत्काळ मदतीस धाव घेतली आणि मच्छीमारांच्या मदतीने तिघांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवाने, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमागील नेमकी कारणमीमांसा करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Leave a Reply