मुंबईच्या पाणी संकटावर बीएमसीचे मोठे पाऊल; गारगाई-पिंजाळ धरणांसह डिसॅलिनेशन प्रकल्प प्रस्तावित

मुंबई : २०४१ पर्यंत मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी तब्बल ६,५३५ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. सध्या बीएमसी ४,००० एमएलडी पाणीपुरवठा करते, परंतु ५०० एमएलडीची कमतरता आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ही तफावत आणखी ५० टक्क्यांनी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यावर उपाय म्हणून बीएमसीने दोन महत्त्वाकांक्षी जल प्रकल्पांना सुरुवात केली आहे. २०१४ मध्ये मध्य वैतरणा धरणानंतर प्रथमच बीएमसीने गारगाई आणि पिंजाळ नद्यांवर धरणे उभारण्याची योजना आखली आहे. गारगाई धरणातून ४४० एमएलडी तर पिंजाळ धरणातून ८६५ एमएलडी पाणी मिळेल, असा अंदाज आहे. याशिवाय गुजरातमधील दमणगंगा नदीतून १,५८६ एमएलडी पाणी वळवण्यासाठी केंद्र, महाराष्ट्र आणि गुजरात सरकार मिळून दमणगंगा-पिंजाळ लिंक प्रकल्प राबवणार आहेत.

यासोबतच मुंबईत डिसॅलिनेशन प्लांट आणि कुलाबा येथे १२ एमएलडी क्षमतेची प्रगत तृतीयक प्रक्रिया सुविधा उभारण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पांमुळे सुमारे ३,१०३ एमएलडी अतिरिक्त पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, पुढील १६ वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. ‘फाईट फॉर राईट फाउंडेशन’चे अध्यक्ष विनोद घोलप यांनी सांगितले की, “गरगाई प्रकल्पासाठी बीएमसीला एक दशक परवानग्या मिळवण्यात गेला. आता प्रत्यक्ष काम सुरू करणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच धुणे आणि आंघोळ यासाठी ६०% पिण्यायोग्य पाणी वाया जाते, त्यावर जनजागृती केली पाहिजे.”

‘पानी हक्क समिती’चे संस्थापक सीताराम शेलार म्हणाले, “मुंबईत प्रक्रिया केलेल्या पाण्यापैकी ३४% म्हणजेच १,४०० एमएलडी पाणी गळतीमुळे वाया जाते. बीएमसीने प्रथम हे गळती रोखणे प्राधान्याने केले पाहिजे.” मुंबईतील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी बीएमसीचे हे प्रयत्न निश्चितच महत्त्वाचे ठरणार असले तरी, त्यांची अंमलबजावणी आणि वेळेवर पूर्णता हेच आता सर्वात मोठे आव्हान आहे.

 

 

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *