पूर्व दिल्लीतील एम.एस. पार्क परिसरात लग्नसमारंभात जेवणासाठी प्रवेश केलेल्या 17 वर्षीय मुलाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. पोलिसांनी रविवारी याची माहिती दिली. घटनास्थळी उपस्थित असलेला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचा (CISF) हेड कॉन्स्टेबल याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता खुनाचा तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, मुलगा भिंत ओलांडून लग्नस्थळी शिरला होता. त्यानंतर आरोपी कॉन्स्टेबलसोबत त्याचे वाद झाले. मुलगा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. गोळी लागल्यानंतर उपस्थितांनी जखमी मुलाला तातडीने हेडगेवार रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करतानाच मृत घोषित केले.
घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरल्या गेल्याचा संशय असलेली रिव्हॉल्वर जप्त करण्यात आली आहे. ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली असून शस्त्र परवाना वैध होता का, याचीही चौकशी सुरू आहे. अटक केलेल्या CISF कॉन्स्टेबलची कानपूर (उत्तर प्रदेश) येथे बदली होती. त्याची चौकशी सुरू असून वादाची नेमकी कारणे आणि घटना कशी घडली याबाबत तपास सुरू आहे.


Leave a Reply