पाळीव कुत्र्याची शौर्यगाथा, बिबट्याच्या पिल्लाशी झुंज देत आई आणि मुलीचे प्राण वाचवले

उत्तराखंडच्या बागेश्वर जिल्ह्यातील काफोली गावात एका पाळीव कुत्र्याने आपल्या धाडसाने मालकिणी व तिच्या मुलीचे प्राण वाचवले. सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्रिलोक चंद्र पांडे यांच्या घरात एका बिबट्याच्या पिल्लाने स्वयंपाकघरात घुसून त्यांच्या पत्नी कमला देवी (४५) आणि मुलगी विजया (१५) यांच्यावर हल्ला केला. स्वयंपाकघरात अचानक बिबट्याचे पिल्लू शिरल्याने गोंधळ उडाला.

कमला देवी यांनी प्रसंगावधान राखत मुलीला दूर सारले, मात्र पळण्याच्या प्रयत्नात दोघीही खाली कोसळल्या आणि जखमी झाल्या. यावेळी त्यांच्या ‘ज्युली’ या पाळीव कुत्र्याने धाडसाने बिबट्यावर झेप घेतली. तब्बल २० मिनिटे त्याने मोठ्या हिंमतीने झुंज दिली आणि बिबट्याला चावा घेतला. या झुंजीदरम्यान बिबट्याच्या पिल्लाने धडपडताना स्वयंपाकघरात ठेवलेल्या जड लोखंडी चुलीला धडक दिली आणि ती बाजूला पडल्याने तो अडकला.

घाबरलेल्या कुटुंबाने तत्काळ वन विभागाला माहिती दिली. वनरक्षक श्याम सिंग करायत यांनी सांगितले की, ज्युलीच्या हल्ल्यामुळे बिबट्याच्या पिल्लाला अनेक जखमा झाल्या. कमला देवी यांच्या दोन्ही जबड्यांना फ्रॅक्चर झाले, तर विजयाला किरकोळ जखमा झाल्या. त्यांना तातडीने १४ किमी दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने प्रथमोपचारानंतर त्यांना घरी परतण्याचा सल्ला देण्यात आला. पर्याय नसल्याने ते मध्यरात्री चालत घरी परतले.

गावकरी सांगतात की, बिबट्यांचे वाढते अस्तित्व हा मोठा धोका बनला आहे. त्रिलोक चंद्र पांडे म्हणाले, “या परिसरात अनेक बिबटे वावरत असल्याने लोकांना दिवसा बाहेर पडणेही धोकादायक झाले आहे. आता आमची गुरेही बाहेर बांधणे शक्य नाही.” हा प्रकार समोर आल्यानंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने या भागात बिबट्यांच्या वाढत्या संख्येबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *