मुंबई: महाराष्ट्रातील विविध सरकारी महामंडळांवरील अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरच केल्या जातील, अशी घोषणा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. यामुळे या पदांसाठी इच्छुक असलेल्या अनेक नेत्या-कार्यकर्त्यांची निराशा झाली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये जो पक्षनिष्ठा दाखवून दमदार यश मिळवेल, त्यांनाच या नियुक्त्यांमध्ये संधी मिळेल. याचाच अर्थ, निवडणुकीतील यशाची बक्षिसी म्हणून या नियुक्त्या केल्या जातील हे आता निश्चित झाले आहे.
निवडणुकीमध्ये ज्यांना तिकीट मिळतील, त्यांना महामंडळांवर नियुक्त केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. एका बैठकीत ६० टक्के महामंडळांचे वाटप निश्चित झाले होते, ज्यामध्ये महामंडळांमध्ये नियुक्तीच्या ३५ टक्क्यांपर्यंत वाटपाचे सूत्र ठरले होते. बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ७८० महामंडळांवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून भाजपच्या ७८५ नेते आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती केली जाईल, पण ती निवडणुकांनंतरच होईल, असे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे. या बैठकांमध्ये भाजपमधून बावनकुळे, रवींद्र चव्हाण, शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई आणि अजित पवार गटाकडून सुनील तटकरे व मंत्री हसन मुश्रीफ सहभागी झाले होते. तीन दिवसांपूर्वीच मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी महामंडळांवरील नियुक्त्या केल्या जातील, असे सांगितले होते. मात्र, बावनकुळे यांच्या ताज्या विधानाने अनेकांच्या आशांवर पाणी फिरले आहे.
Leave a Reply