नांदेड : राज्यातील ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या (एपीआय) पदोन्नतीच्या आदेशाची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या अधिकार्यांचा आनंद काही तासांतच मावळला आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गुरुवार, दि. २१ ऑगस्ट रोजी पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आले होते. या आदेशानुसार एपीआयना पोलिस निरीक्षक म्हणून नवीन ठिकाणी रुजू होण्याची संधी मिळणार होती. मात्र, मॅटमधील एका प्रकरणामुळे या पदोन्नतीला तात्पुरता ब्रेक बसला आहे.
संभाजीनगर परिक्षेत्राच्या विशेष पोलिस महानिरीक्षक सुप्रिया पाटील-यादव यांच्या स्वाक्षरीने हे आदेश काढण्यात आले होते. आदेश जाहीर झाल्यानंतर अनेकांनी नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी तयारी सुरू केली होती. परंतु दुसऱ्याच दिवशी, म्हणजे दि. २२ ऑगस्ट रोजी गृहमंत्रालयाच्या उपसचिव सुचित्रा अग्रवाल यांनी नव्या सूचनांनुसार कार्यवाही थांबवली. या आदेशानुसार, पदोन्नती मिळालेल्या कोणत्याही पोलिस निरीक्षकाला कार्यमुक्त करू नये, तसेच जर कोणी कार्यमुक्त केले असेल तर त्यांना पुन्हा मूळ पदावर व मूळ ठिकाणी परत पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ही स्थिती पुढील आदेश येईपर्यंत कायम राहणार असून पदोन्नतीचा आनंद सध्या अपूर्ण राहिला आहे. त्यामुळे आधीच अनेक वर्षे पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या अधिकार्यांचा हिरमोड झाला आहे. पोलिस निरीक्षक म्हणून रुजू होण्याच्या तयारीत असलेल्या अधिकारीवर्गात नाराजीचे वातावरण पसरले आहे. राज्य शासनाने याबाबत पुढील आदेश कधी काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तोपर्यंत ३६४ अधिकारी आपल्या मूळ पदावरच काम करणार असून त्यांची पदोन्नती ‘स्टँडबाय’वर ठेवण्यात आली आहे. या निर्णयामुळे पोलिस विभागात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Leave a Reply