मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यमय बनवण्याच्या दिशेने बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘विशेष स्वच्छता मोहीम ’ सुरू केली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी महानगरपालिका, सरकारी आणि खासगी अशा एकूण ३४ रुग्णालयांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली. सोमवारी सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत ४९ मेट्रिक टन राडारोडा, ४३ मेट्रिक टन कचरा आणि २४ मेट्रिक टन टाकाऊ मोठ्या वस्तू गोळा करून विल्हेवाट लावण्यात आली.
ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी १,५२३ कर्मचारी आणि कामगारांनी १३५ यंत्रसामग्रीच्या सहाय्याने अथक परिश्रम घेतले. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम संपूर्ण मुंबईत प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा प्रारंभ ३ मार्च २०२५ रोजी एकाचवेळी सर्व प्रशासकीय विभागांमध्ये करण्यात आला.
महानगरपालिकेचे कर्मचारी, रुग्णालय प्रशासन, स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहनिर्माण सहकारी संस्था तसेच सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरिकांनीही या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला, ज्यामुळे ही मोहीम अधिक प्रभावी ठरत आहे.
BMCच्या या मोहिमेअंतर्गत कामा व आल्बेस रुग्णालय, नागपाडा पोलिस रुग्णालय, शीव (सायन) रुग्णालय, के. ई. एम. रुग्णालय, व्ही. एन. देसाई रुग्णालय, एस. के. पाटील रुग्णालय, भाभा रुग्णालय (कुर्ला), राजावाडी रुग्णालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय (टागोर नगर), सैफी रुग्णालय, नानावटी रुग्णालय, चारकोप दवाखाना, शताब्दी रुग्णालय आणि अनेक खासगी तसेच सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
बृहन्मुंबई महानगरपालिकाचे उपआयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले की, या विशेष मोहिमेत रुग्णालय परिसर, पदपथ, वाहनतळ, सार्वजनिक प्रसाधनगृहे यांची स्वच्छता करण्यात येत आहे. याशिवाय, अनधिकृत जाहिरात फलक, टाकाऊ साहित्य, बेकायदेशीर पार्किंगमुळे साचलेला कचरा आणि वाढलेली झाडेझुडपे यांचाही निःपात करण्यात आला आहे.
ही स्वच्छता मोहीम ३ मार्च २०२५ रोजी सुरू झाली असून, पुढील १५ दिवस म्हणजेच १७ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण मुंबईत राबविली जाणार आहे. शासकीय, महानगरपालिका तसेच खासगी रुग्णालये आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास बृहन्मुंबई महानगरपालिकाने व्यक्त केला आहे.
Leave a Reply