मुंबई ते अहमदाबाददरम्यान सुरु असलेले बुलेट ट्रेनचे काम वेगात प्रगती करत असून, हा प्रकल्प २०२८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. विशेष म्हणजे, या प्रकल्पाअंतर्गत वाढवण बंदराजवळ अत्याधुनिक बुलेट ट्रेन स्थानकाची उभारणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.राज्यात सध्या रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, जलमार्ग, बंदरे आणि विमानतळ यांसारख्या महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचा परस्पर पूरक असा ‘विकासाचा परिसंस्था’ (इकोसिस्टीम) तयार होत असून, त्यामुळे महाराष्ट्र देशाच्या विकास नेतृत्वात आघाडीवर राहील, असा ठाम विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकोनॉमिक कॉरिडोर समिट २०२५’मध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.मुंबईमध्ये सध्या सागरी किनारा रस्ता, अटल सेतू आणि विविध मेट्रो मार्गांचे प्रकल्प वेगाने सुरू आहेत. या भव्य प्रकल्पांमुळे मुंबईत तब्बल ५० अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणुकीची संधी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.या विकास संकल्पनेचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर. हे बंदर सध्या अस्तित्वात असलेल्या जेएनपीटीपेक्षा तब्बल तीनपट मोठं असणार आहे. वाढवण बंदराला प्रवेश नियंत्रित महामार्गांद्वारे नाशिक आणि समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.याच परिसरात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ‘चौथी मुंबई’ या भव्य शहराच्या विकासाची योजना आखण्यात आली आहे. हे सर्व प्रकल्प एकत्रितपणे महाराष्ट्राला जागतिक स्तरावर आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र बनवतील, असा ठाम विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
विविध प्रकल्पांबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध योजनांची सविस्तर माहिती दिली.ते म्हणाले की, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली व पश्चिम घाटातील पाणी उजनी धरणात वळविले जाणार आहे, आणि त्याद्वारे मराठवाड्याकडे वळवले जाईल. या महत्त्वपूर्ण पाण्याच्या व्यवस्थापनामुळे मराठवाडा भविष्यात कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.समृद्धी महामार्गाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता ‘नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग’ हाती घेण्यात येणार आहे, जो राज्याच्या दक्षिणेकडील भागाच्या विकासाला चालना देईल.
सध्या जेएनपीटीपासून नागपूरपर्यंत मालवाहतूक फक्त आठ तासांत करता येते आणि वाढवण बंदरामुळे ही गती अधिक वाढेल.
नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कार्गो हब विकसित होत आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांच्या जोरावर ‘तिसऱ्या मुंबई’चा विकास वेगाने आकार घेत आहे. या नव्या महानगरात एज्यु-सिटी, हेल्थ-सिटी आणि इनोव्हेशन-सिटी सारख्या आधुनिक शहरांची उभारणी सुरू आहे.या क्षेत्रात देशविदेशातील प्रसिद्ध विद्यापीठे आपली केंद्रे स्थापन करण्यास इच्छुक असून, शिक्षण, आरोग्य आणि नवोपक्रम क्षेत्रात तिसरी मुंबई एक नवा जागतिक केंद्रबिंदू ठरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जेच्या क्षेत्रातील राज्याच्या भव्य योजनांची माहिती देताना सांगितले की, कृषी क्षेत्रासाठी १६,००० मेगावॉट वीज पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.सध्या राज्यातील सौरऊर्जेची क्षमता २१ टक्के इतकी असून, ती २०३० पर्यंत ५२ टक्क्यांपर्यंत नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या दिशेने महत्वाची पावले उचलली जात असून, सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत ३,००० ट्रान्सफॉर्मर्स आधीच सौरऊर्जेवर कार्यान्वित करण्यात आले आहेत.महाराष्ट्र सार्वजनिक वाहतूक आणि वाहने यामध्येही मोठे बदल घडवीत असून विद्युत वाहनांच्या वापरात राज्याने देशात अग्रेसर स्थान मिळविले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
बुलेट ट्रेनसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात अडथळा निर्माण झाला होता, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.ते म्हणाले, गुजरातमध्ये प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असताना महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या काळात ते पूर्णपणे ठप्प होते. सुमारे ७०-८० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाचे काम अडीच वर्षे बंद राहिल्याने त्यावरील व्याजाचा बोजा कोणावर व किती पडणार आहे? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.आमचे सरकार आल्यापासून गेली अडीच वर्षे ते वेगाने सुरू असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
Leave a Reply