छ. संभाजी नगर : माजी खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एका पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिरसाट यांनी साजापूर येथील एका विशिष्ट समाजासाठी राखीव असलेली जमीन लाटली असा आरोप करताना त्यांनी जातीवाचक शब्दांचा वापर केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या जातीवाचक उल्लेखांमुळेच ॲट्रॉसिटी (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा) कायद्यांतर्गत त्यांच्यावर क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमिनीचा वाद काय आहे?
जलील यांनी पत्रकार परिषदेत संजय शिरसाट यांच्यावर सुमारे १३ कोटींच्या तीन जमिनींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. यामध्ये शेंद्रा एमआयडीसीतील ६ कोटींची जमीन, जालना रोडवरील १२ हजार चौरस फुटाची जमीन (सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर ५ कोटी ८३ लाख ९४ हजार रुपये किमतीची असल्याचा दावा) आणि १० एकर जमीन १ कोटी १० लाख रुपयांत घेतल्याचा आरोप आहे, ज्याची बाजारातील किंमत ३ कोटी रुपये असल्याचे जलील यांनी म्हटले आहे. त्यांनी या संदर्भात काही कागदपत्रेही सादर केली आहेत.
इम्तियाज जलील यांच्यावर यापूर्वीही एका भाजप पदाधिकाऱ्याबाबत जातीवाचक उद्गार काढल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. या नवीन गुन्ह्यामुळे संजय शिरसाट आणि इम्तियाज जलील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. शिरसाट समर्थकांनी जलील यांच्या घराबाहेर शेणफेक करण्याचा प्रयत्न केल्याचीही घटना घडली आहे, ज्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटून संजय शिरसाट यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी संजय शिरसाट यांच्या जमीन खरेदी प्रकरणाची ईडी चौकशीची मागणीही केली आहे. या प्रकरणावरून आता दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून पुढील कारवाई अपेक्षित आहे.
Leave a Reply