सीबीआयने ‘ऑपरेशन चक्र-V’ अंतर्गत एक मोठी आणि नियोजनबद्ध कारवाई करत, डिजिटल अरेस्टसारख्या नव्या सायबर फसवणुकीमध्ये अडकलेल्या टोळीतील चार जणांना अटक केली आहे. देशभरातील तब्बल १२ ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले आरोपी मुंबई आणि मुरादाबाद येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.डिजिटल अरेस्ट या नव्या सायबर गुन्ह्याचं जाळं संपवण्यासाठी सीबीआयने कंबर कसली आहे. गेल्या काही महिन्यांत अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारींचा भडिमार झाल्यानंतर, राजस्थान सरकारच्या विनंतीवरून सीबीआयने झुंझुनू येथील सायबर पोलिस स्टेशनमधील प्रकरणाचा तपास स्वतःच्या ताब्यात घेतला.या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे – एका व्यक्तीला पोलिस, सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स अशा सरकारी एजन्सींच्या नावाने तब्बल तीन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवण्यात आलं. या काळात ४२ व्यवहारांच्या माध्यमातून त्याची तब्बल 7.67 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली.
सीबीआयने या प्रकरणाचा तांत्रिक विश्लेषण व डेटा प्रोफाइलिंगच्या आधारे खोलात जाऊन तपास केला. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, संभल, महाराष्ट्रातील मुंबई, राजस्थानमधील जयपूर आणि पश्चिम बंगालमधील कृष्णनगर येथे शोधमोहीम राबवण्यात आली.या कारवाईत बँक तपशील, डेबिट कार्ड, चेक बुक्स, डिजिटल उपकरणे आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले. चौघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करताच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सध्या सुरूच आहे.
डिजिटल अरेस्ट म्हणजे नक्की काय?
डिजिटल अरेस्ट ही सायबर फसवणुकीची एक अत्यंत चतुर आणि घातक पद्धत आहे. यात भामटे पोलिस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा ड्रग विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून पीडितेला फोन करतात. त्यांच्यावर किंवा त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करत व्हिडीओ कॉलवर अटक दाखवण्याची नाटकं करतात. नंतर खोटी कागदपत्रं दाखवून भीती निर्माण केली जाते आणि ‘जामिनासाठी’ किंवा ‘कारवाई थांबवण्यासाठी’ पैसे भरण्याचा दबाव आणला जातो.


Leave a Reply