सीसीटीव्ही फुटेज आणि भटक्या कुत्र्याच्या मदतीने मुंबई पोलिसांनी कचरा वेचकाच्या हत्येचा केला उलगडा

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका भटक्या कुत्र्याच्या शोधाच्या आधारे नवी मुंबई पोलिसांनी ४५ वर्षीय कचरा वेचकाच्या हत्येचा उलगडा केला आहे. हा गुन्हा १५ एप्रिल रोजी घडला होता आणि अवघ्या दोन दिवसांत आरोपीला अटक करण्यात आली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी दिली.
१३ एप्रिल रोजी पहाटे नेरुळ परिसरात रक्ताच्या थारोळ्यात एक अज्ञात पुरुष आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना असे दिसून आले की, एका व्यक्तीने कचरा वेचणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर बोथट वस्तूने जोरदार हल्ला केला होता. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.“सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता आणि गुन्हा घडताना तिथे कोणीही उपस्थित नव्हते,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
तपासादरम्यान सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन ढगे यांच्या लक्षात आले की, गुन्ह्याच्या ठिकाणी एक काळ्या रंगाचा कुत्रा होता, ज्याच्या पोटावर पांढरी पट्टी दिसत होती. विशेष म्हणजे, घटनेदरम्यान हा कुत्रा हल्लेखोरावर भुंकत नव्हता. या निरीक्षणावरून पोलिसांना संशय आला की हा कुत्रा आणि हल्लेखोर एकमेकांशी संबंधित असू शकतात. त्यांनी या कुत्र्याचा शोध सुरू केला. नेरुळ उड्डाणपुलाखाली पोलिसांना असाच एक कुत्रा आणि त्याच्या सोबत राहणारा एक व्यक्ती आढळला. या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की हा कुत्रा सहसा मनोज प्रजापती नावाच्या व्यक्तीसोबत असतो.
१५ एप्रिल रोजी पोलिसांनी भूर्याला नेरुळ उड्डाणपुलाखाली झोपलेला आढळला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
“भूर्या उर्फ मनोज प्रजापती याने सांगितले की, मृत व्यक्ती नेहमी त्याला मारहाण करत असे आणि त्याच्या खिशातील पैसे हिसकावून घेत असे. त्यामुळेच त्याने रागाच्या भरात त्याचा खून केला,” असे अधिकाऱ्याने सांगितले. १३ एप्रिल रोजी पहाटे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि त्यातच कचरा वेचकाचा मृत्यू झाला. भटक्या कुत्र्याच्या निष्ठेमुळे पोलिसांना मिळाला धागा प्रजापतीने पोलिसांना सांगितले की, तो भटक्या कुत्र्याला नियमितपणे खायला घालत असल्याने तो कायम त्याच्या मागोमाग फिरत असे. याच गोष्टीचा फायदा पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी झाला. तपासादरम्यान पोलिसांनी २० वर्षीय एका फूटपाथवर राहणाऱ्या तरुणाला साक्षीदार म्हणून नोंदवले, ज्याने त्यांना आरोपीपर्यंत पोहोचवले. पीडित व्यक्तीची ओळख पटलेली नसून पोलिस त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *