नवी दिल्ली : केंद्र सरकारने पशुखाद्य उद्योगाला मोठा दिलासा दिला आहे. गेल्या एका वर्षापासून लागू असलेली तेलमुक्त तांदळाच्या कोंड्याच्या निर्यातीवरील बंदी अखेर हटवण्यात आली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारी अधिसूचनेद्वारे हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे देशातील पशुखाद्य उद्योग, प्रक्रिया उद्योग तसेच शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे.
खाद्यतेल उद्योग संस्था आणि सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एसईए) यांच्याकडून या बंदी उठवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. जागतिक बाजारपेठेत तेलमुक्त तांदळाच्या कोंड्याला मोठी मागणी असताना भारतात त्याच्या निर्यातीवर निर्बंध असल्यामुळे उद्योग व शेतकरी दोघांनाही तोटा होत होता. पशुधनासाठी पौष्टिक खाद्य तयार करण्यासाठी या कोंड्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे निर्यात पुन्हा सुरू झाल्याने देशांतर्गत बाजाराला चालना मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला दर मिळेल, असा उद्योग क्षेत्राचा विश्वास आहे.
दरम्यान, डीजीएफटीने दुसऱ्या एका अधिसूचनेत शेजारील भूतानला ११ कृषी उत्पादनांच्या निर्यातीवरील निर्बंधातून सूट दिली आहे. यामध्ये दुग्धजन्य पदार्थ, कापूस, बटाटे, तांदूळ, गहू, चहा, सोयाबीन तेल, पाम तेल, साखर आणि मीठ यांचा समावेश आहे. या निर्णयामुळे भारत-भूतान व्यापारसंबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा आहे. तसेच भूतानला तातडीच्या गरजेत मदत म्हणून १०० टन गहू विनाशुल्क पुरवठा केला जाणार आहे.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील कृषी व उद्योग क्षेत्राला दुहेरी दिलासा मिळणार आहे. एका बाजूला शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागणार असून दुसऱ्या बाजूला पशुखाद्य उद्योगाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी मिळणार आहे.
Leave a Reply