केंद्र सरकारच्या पशुपालन व दुग्धव्यवसाय मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कारांची (NGRA) घोषणा यंदासाठी करण्यात आली असून, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील शेतकरी अरविंद यशवंत पाटील यांनी देशातील सर्वोत्तम दुग्धव्यवसायिक म्हणून मानाचा पुरस्कार पटकावला आहे. स्थानिक जातीच्या गायी-म्हशींचे संगोपन, संवर्धन आणि उत्कृष्ट दुधउत्पादन पद्धतींच्या माध्यमातून त्यांनी आदर्श ठरवला असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशभरातील शेतकऱ्यांना स्थानिक जातिवंत गुरांच्या संवर्धनाकडे प्रोत्साहन मिळावे, तसेच दुग्धव्यवसायात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे दरवर्षी ‘गोपाल रत्न’ पुरस्कार दिले जातात. यावर्षी देशभरातून तब्बल २०८१ अर्ज प्राप्त झाले होते. कठोर छाननीनंतर विविध श्रेणीतील विजेते निवडण्यात आले.
अरविंद पाटील यांनी गेल्या काही वर्षांत स्थानिक जातींच्या गाई-म्हशींचे पालन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्तम खाद्य व्यवस्थापन, आरोग्य सुरक्षा आणि दर्जेदार दुधउत्पादन यावर भर दिला आहे. त्यांच्या शेतातील व्यवस्थापन पद्धती आज अनेक शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत असून, स्थानिक जनावरांच्या क्षमतेवर विश्वास ठेवत त्यांनी दुग्धव्यवसायाला लाभदायक दिशा दिल्याचे मानले जाते.
यंदाचे विविध पुरस्कार २६ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारतर्फे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील दुग्धव्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय आणि देशी जनावरांचे संवर्धन यांना मोठी चालना मिळण्यास अशा पुरस्कारांचा मोठा हातभार लागतो, असेही मंत्रालयाने नमूद केले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या पुरस्कारामुळे कोल्हापूर जिल्ह्याचा सन्मान वाढला असून, राज्यातील अन्य दुग्धव्यवसायिकांसाठीही हे प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.


Leave a Reply