लोणी (अहिल्यानगर): महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार असल्याची ग्वाही केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचा सविस्तर अहवाल प्राप्त होताच केंद्राकडून निधी वितरित करण्यात येईल, असे ते म्हणाले.
लोणी येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित सहकार मेळाव्यात अमित शाह उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, तसेच मंत्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, जयकुमार गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
अमित शाह म्हणाले, “२०१५-१६ मध्ये राज्य सरकारने ८,१३२ कोटी रुपयांची मदत मागितली होती. तेव्हा केंद्राने ८,६३९ कोटींची मदत दिली होती. यंदाही केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील.”
त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा उल्लेख करताना विनोदी शैलीत म्हटले, “ते बनिया नाहीत, पण बनियापेक्षा कमीही नाहीत,” असे सांगून सभेत हास्याचा माहोल निर्माण केला.
शाह यांनी शनिवारी रात्री शिर्डी येथे आगमन करून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त भागांचा आढावा घेऊन केंद्राची मदत तातडीने मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अन्याय करणाऱ्या आणि दरात काटा मारणाऱ्या साखर कारखान्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
दरम्यान, रावसाहेब दानवे पाटील यांनी राज्य सरकारने तातडीने नुकसानीचा प्रस्ताव सादर करावा, जेणेकरून केंद्राकडून मदत जलद मिळू शकेल, अशी मागणी केली.
Leave a Reply