मुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) कक्षातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांची संख्या यंदापासून तीनवरून चार करण्यात आली आहे. राज्य सरकारने अभियांत्रिकीसह तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांसाठी ही महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे. यापूर्वी केंद्रीभूत प्रवेशाच्या केवळ तीनच फेऱ्या होत असल्याने विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी व्यवस्थापन कोट्याचा आधार घ्यावा लागत होता. तिसऱ्या फेरीनंतर विद्यार्थ्यांना संस्थात्मक स्तरावर प्रवेश घ्यावा लागत असे, जिथे अनेकदा महाविद्यालये नियमित शुल्काच्या दोन ते तीन पट अधिक शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठीच केंद्रीभूत प्रवेश फेऱ्यांची संख्या आता चार करण्यात येणार आहे.
चौथ्या फेरीनंतरच थेट प्रवेश
विद्यार्थ्याने पहिल्या फेरीतील पहिले महाविद्यालय, दुसऱ्या फेरीतील पहिली तीन महाविद्यालये, तिसऱ्या फेरीतील पहिली सहा, आणि चौथ्या फेरीतील सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळूनही जर प्रवेश घेतला नाही, तर त्याला पुढील फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. अशा परिस्थितीत त्याला थेट संस्थात्मक स्तरावर चौथ्या फेरीनंतर प्रवेश घ्यावा लागेल.
अर्ज नाकारता येणार नाही, प्रवेश बंधनकारक
यापूर्वी संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयांकडे अर्ज करावा लागत असे आणि अनेकदा महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारत असत. या पार्श्वभूमीवर, आता विद्यार्थ्यांना सीईटीच्या संकेतस्थळाद्वारे संस्थात्मक स्तरावरील प्रवेशासाठी अर्ज करता येणार आहे. सीईटी सेलकडून हे अर्ज संबंधित संस्थांना पाठवले जातील. संस्थांना गुणवत्ता यादी तयार करताना या अर्जांचा विचार करणे बंधनकारक असेल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता कमी होईल.
प्रवेश कधी बंधनकारक?
●पहिल्या फेरीत विद्यार्थ्याने नमूद केलेल्या पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाल्यास.
●दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्याने नमूद केलेल्या पहिल्या तीन पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास.
● तिसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्याने नमूद केलेल्या पहिल्या सहा पसंतीक्रमाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्यास.
हा बदल विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी मिळवण्यासाठी अधिक पारदर्शकता आणि सोयी सुविधा देईल अशी अपेक्षा आहे.


Leave a Reply