मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावर आपल्या अफलातून अभिनयाने आणि भन्नाट विनोदाने प्रेक्षकांचं मन जिंकणारा ‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे सध्या चर्चेत आहे, पण यावेळी कारण हसण्याचं नव्हे, तर धक्कादायक रडवणाऱ्या फसवणुकीचं. सतत लोकांना खळखळून हसवणारा हा मराठमोळा अभिनेता आता स्वतःच सायबर क्राईमचा बळी ठरला आहे. एक अनोळखी महिला, व्हॉट्सअॅपवर आलेला मेसेज, सुरुवातीचं आमिष आणि त्यानंतर थेट ६१ लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा;हे प्रकरण ऐकून मराठी कलाविश्वातही खळबळ उडाली आहे.
फसवणुकीचा फॉर्म्युला ‘लाईक करा, पैसे मिळवा’
फेब्रुवारी २०२५ मध्ये एका अज्ञात महिलेने सागर कारंडेला व्हॉट्सअॅपवर संपर्क केला. सुरुवात साधी होती इंस्टाग्रामवरील पोस्ट लाईक केल्यास १५० रुपये मिळतील. दिवसाला साधारण 6,000 रुपये कमावता येतील, असंही तिनं नमूद केलेलं. सागरनं तिला होकार दिला आणि तिथेच तो फसला काही पेजेसची लिंक पाठवून ‘लाईक’ करण्याचं सांगितलं गेलं, आणि खरंच त्याबदल्यात काही रक्कम सागरच्या खात्यात जमा देखील झाली. पण हसत-हसत सुरू झालेलं हे ‘डील’ नंतर गुंतवणूक योजनेच्या नावाखाली मोठ्या स्कीममध्ये बदललं. जास्त कमाईच्या आमिषाने सागर अधिक पैसे गुंतवत गेला आणि काही दिवसांत ६१ लाखांचा फसवणूकप्रसंग त्याच्या समोर उभा ठाकला!
पोलिसांत धाव ;गुन्हा नोंदवला
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच सागरने तात्काळ पोलिसांत धाव घेतली आणि सविस्तर तक्रार दाखल केली. पोलिसांनी याची तातडीने दखल घेतली असून सायबर क्राईम सेलमार्फत तपास सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करत सांगितलं अशा ऑनलाईन स्कीम्सपासून सावध रहा, कुठल्याही अमिशांना बळी पडू नका. अशा प्रकरणांमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
कलाविश्वात चिंता;प्रसिद्ध अभिनेत्यालाच फसवलं, तर सामान्यांचं काय?
सागर कारंडे सारख्या लोकप्रिय कलाकारालाही अशा स्कीमच्या जाळ्यात अडकवलं जाऊ शकतं, तर सामान्य माणूस किती असुरक्षित आहे यावरही या प्रकरणामुळे चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply