कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत अवघ्या 24 तासांत राजकीय चित्र पालटले असून ‘चंदगड पॅटर्न’ आता कागलमध्येही आकाराला आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवार गट—एकाच व्यासपीठावर आले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांच्यात झालेल्या अनपेक्षित आघाडीमुळे कागलमधील सत्तेचं गणित पूर्णपणे बदललं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे समरजीत घाटगे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांनी हातमिळवणी केली होती. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्यासाठी कागलची लढत कठीण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र राजकीय डावपेच कौशल्य दाखवत मुश्रीफ यांनी कट्टर विरोधक असलेल्या घाटगेंशी थेट तह साधला आणि समीकरणे पूर्णपणे बदलली.
या नव्या आघाडीत नगराध्यक्षपद मुश्रीफ गटाला तर उपनगराध्यक्षपद घाटगे गटाला देण्याचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. कागलमधील दोन्ही गटांची मजबूत संघटना आणि मतदारांमधील प्रभाव लक्षात घेता ही आघाडी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. परिणामी संजय मंडलिकांचा गट मात्र पूर्णपणे एकाकी पडल्याचं स्पष्ट होत आहे.
कागलमधील हा बदल हा ‘चंदगड पॅटर्न’चा पुढचा टप्पा मानला जात आहे. चंदगड नगरपालिकेत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आणण्यात यश मिळवलेल्या हसन मुश्रीफ यांनी तोच पॅटर्न पुन्हा राबवला आहे. त्यामुळे कागलमधील ही आघाडी केवळ स्थानिक राजकारणापुरती मर्यादित न राहता कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर नगरपालिका निवडणुकांवर तसेच व्यापर राज्यराजकारणावरही परिणाम करणारी ठरू शकते. कागलमधील हे बदललेले समीकरण आगामी लढतीत कोणत्या दिशेने जाते हे आता उत्सुकतेने पाहण्यात येत आहे.


Leave a Reply