मुंबई: मुस्लिम समाजाचा महत्त्वाचा धार्मिक सण ईद-ए-मिलाद यंदा विशेष पद्धतीने साजरा होणार आहे. मात्र, यंदा या सणाच्या सुट्टीत मोठा बदल करण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांसाठी शुक्रवार, ५ सप्टेंबरऐवजी सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
राज्य सरकारने डिसेंबर २०२४ मध्येच २०२५ सालातील २४ सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना जाहीर केली होती. त्यामध्ये ईद-ए-मिलादची सुट्टी ५ सप्टेंबर रोजी घोषित करण्यात आली होती. मात्र, या वर्षी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचा उत्सव असल्याने, दोन मोठे सण सलग आल्याने गर्दी व शिस्तीचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे हिंदू-मुस्लिम बंधुता आणि सौहार्द जपण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुस्लिम समाजाने ८ सप्टेंबर रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानंतर राज्य सरकारने विशेष अधिकारांचा वापर करत मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये सोमवार, ८ सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पूर्वनियोजितप्रमाणे शुक्रवार, ५ सप्टेंबर हीच सुट्टी लागू राहणार आहे. या बदलामुळे मुंबईतील मुस्लिम बांधवांना पारंपरिक जुलूस आणि धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे करता येतील, तसेच अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीत कोणतीही अडचण येणार नाही. सरकारच्या या निर्णयाचे विविध स्तरांवर स्वागत होत आहे.
Leave a Reply