मुंबई : महाराष्ट्र सरकार लवकरचं मीडिया मॉनिटरिंग सेंटरची स्थापना करणार आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद पण करण्यात आली आहे. मात्र याबाबत बातम्या येताच या मीडिया सेंटरला विरोध केला जात आहे. माध्यमांवर कंट्रोल आणण्यासाठी अशा पद्धतीचे मीडिया मॉनिटरिंग सेंटर आणलं जातंय, अशी टीका केली जात आहे. यादरम्यान स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या टिकांना उत्तर दिले आहे. ‘आमचं मीडियाला कंट्रोल करण्याचा कुठलाही हेतू नाहींये. मात्र प्रसिध्द झालेल्या बातम्यांवर आम्ही लक्ष देऊ इच्छितो. जेणेकरून कुठली फेक किंवा नकारात्मक बातमी आल्यास त्यावर तात्काळ स्पष्टीकरण देता येईल’ असं फडणवीस म्हणाले.
नियंत्रण ठेवण्याचा आमचा हेतू नाही : फडणवीस
राज्य सरकारच्या माहिती आणि प्रचार संचालनालयाअंतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या मीडिया मॉनिटरिंग सेंटरबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरे दिली. ते म्हणाले की, मॉनिटरिंग सेंटरद्वारे माध्यमांवर नियंत्रण ठेवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. प्रतिसाद आणि स्पष्टीकरणाच्या उद्देशाने प्रकाशित किंवा प्रसारित होणाऱ्या बातम्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ही यंत्रणा तयार केली जात आहे, असं ते म्हणाले.
प्रकाशने, चॅनेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वाढत्या संख्येमुळे असे केंद्र निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे एका प्रस्तावात म्हटले आहे. सरकारी योजना आणि धोरणांशी संबंधित बातम्या कशा दिल्या जातात यावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे. सरकारशी संबंधित बातम्या पीडीएफ स्वरूपात गोळा करण्यासाठी एका व्यावसायिक सल्लागाराची नियुक्ती केली जाईल. यासोबतच, विविध मुद्दे, व्यक्ती, विभाग, सकारात्मक आणि नकारात्मक अशा श्रेणी देखील विभागल्या जातील, अशी माहिती आहे.
Leave a Reply