मुंबई: मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागांचे चित्र ‘शक्तिपीठ महामार्गा’मुळे पूर्णपणे बदलेल आणि हा महामार्ग या भागांसाठी ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. सध्या या प्रकल्पाला जे विरोध करत आहेत, त्यांनी यापूर्वी ‘समृद्धी महामार्गा’लाही असाच विरोध केला होता; मात्र आज समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
या महामार्गाच्या प्रकल्पावर वित्त विभागाने काही आक्षेप घेतले होते. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करत असल्याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “कुरघोडी कसली? कोणताही मोठा प्रकल्प येत असताना त्याचा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल, किती कर्ज घ्यावे लागेल, आणि त्यासाठी वित्तीय जबाबदारी किती वाढेल, यावर मत मांडणे हे वित्त विभागाचे कर्तव्यच आहे.” ते पुढे म्हणाले की, जरी वित्तीय जबाबदारी वाढत असली तरी, त्यातून जर सकारात्मक परतावा मिळणार असेल, तर राज्य मंत्रिमंडळ योग्य निर्णय घेते.
केवळ महामार्ग नाही, एकात्मिक विकासाचे साधन:
मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले की, दुष्काळी भागातील परिस्थिती बदलायची असेल, तर शक्तिपीठ महामार्ग हे त्याचे एकमेव उत्तर आहे. या महामार्गावर प्रत्येक १०० किलोमीटरवर ५०० ते १००० शेततळी बांधली जाणार आहेत. तसेच, महामार्गावरील नाल्यांवर बंधारे बांधून पाणी अडवले जाईल. त्यामुळे दुष्काळी भागात जलसंधारण आणि जलपुनर्भरण मोठ्या प्रमाणावर होईल. याव्यतिरिक्त, मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जाही तयार होईल. हा केवळ एक महामार्ग नसून, तो एकात्मिक विकासाचे साधन ठरेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शरद पवार: ‘प्रकल्प समजून घेणार, नंतरच बोलणार’
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. ते म्हणाले, “शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प नेमका काय आहे, त्याची आवश्यकता आहे का, हे आधी समजून घेईन. राज्य सरकारने याबद्दल माहिती दिल्यास तीही विचारात घेईन. शेतकरी आणि राजू शेट्टी यांच्यासह सर्वांचा विरोध का आहे, हेही समजून घ्यावे लागेल. विरोधासाठी विरोध नको, सर्व गोष्टी समजून घेतल्यानंतरच मी या विषयावर बोलेन.”
मंत्री हसन मुश्रीफ: ‘जिथे विरोध, तिथे मार्ग बदलणार’
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “शक्तिपीठ महामार्ग हा राज्य सरकारचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे आणि तो पूर्ण होणारच आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, कोल्हापुरातून हा महामार्ग कसा नेता येईल, यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने चार पर्याय दिले आहेत. त्यावर चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेतले जाईल; मात्र जिथे विरोध होईल, तिथे महामार्गाची ‘लाइन’ बदलण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मुश्रीफ यांनी दिली.
Leave a Reply