सावंतवाडी : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 91 फूट उंचीच्या पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही फक्त पूजा आणि आरती करायला आलो आहोत. पुतळ्याचे अनावरण या आदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजन केले.यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, खा.नारायण राणे, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आ.दिपक केसरकर, आ.निलेश राणे, आ.रविंद्र फाटक, आ.निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत शिव आरती झाल्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे या ठिकाणच्या भागाला पर्यटन दृष्ट्या अजून महत्व येईल. गेल्या वर्षी २६ ऑगस्टला इथला पुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर सहा महिन्यात जगाला हेवा वाटेल असा पुतळा उभारण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं, त्याप्रमाणे ३१ कोटी ७५ लाख रुपये खर्च करून ६० फूट उंचीचा हा ब्राँझ धातूचा पुतळा उभारण्यात आला आहे.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पुतळा म्हणजे स्वाभिमान आणि शौर्याचे देदीप्यमान प्रतीक आहे, असे गौरवोद्गार काढले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आजचा दिवस आमच्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा शौर्याचे देदीप्यमान प्रतीक म्हणून उभा आहे. या पुतळ्याची दुर्घटना झाल्यानंतर, आम्ही तातडीने निर्णय घेतला की, हातात समशेर असलेला पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी उभा करायचा.
”या पुतळा उभारणीचे काम मेसर्स राम सुतार आर्ट क्रियेशन्स, दिल्ली यांनी उभारले असून याच्या मजबुतीसाठी आवश्यक ती काळजी घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुतळ्याच पूजन केल्यानंतर परिसराची पाहणी करून समाधान व्यक्त केलं. पुतळा उभारणीसाठी हातभार लावलेल्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीगीत आणि राज्यगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता झाली.
Leave a Reply