मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल; “नोट चोरी बंद झाल्याने आता व्होट चोरीचे आरोप”

नागपूर – मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी (SIR) करण्याच्या निर्णयावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर दिले. “विरोधक निराश झाले आहेत. त्यांचा पराभव निश्चित असल्याने ते आधीच ‘कव्हर फायर’ करत आहेत. नोट चोरी थांबल्यामुळे आता ते व्होट चोरीचे आरोप करत आहेत,” असा टोला फडणवीसांनी लगावला.

फडणवीस म्हणाले, “मतदारयाद्यांची सखोल फेरतपासणी हा अत्यंत चांगला निर्णय आहे. गेल्या २५ वर्षांपासून देशात अशा प्रकारची तपासणी झालेली नव्हती. २०१२ मध्ये याबाबत मीच उच्च न्यायालयात गेलेलो होतो. आता ही तपासणी झाल्यानंतर याद्या ब्लॉकचेन पद्धतीने तयार करायला हव्यात. प्रत्येक मतदाराचा विशिष्ट आयडी तयार झाला, तर तो व्यक्ती दुसऱ्या राज्यात गेल्यासही मतदान करू शकेल.”

दरम्यान, फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरही फडणवीसांनी टीका केली. “राहुल गांधींना कोणत्याही घटनेची पूर्ण माहिती नसते. ते सोशल मीडियावर पोस्ट करण्यापूर्वी काहीही पडताळणी करत नाहीत. संबंधित डॉक्टरने आत्महत्येपूर्वी तिच्या हातावर लिहून ठेवले आहे, यातून सर्व स्पष्ट होतं. दोषींवर कारवाई होणार आहे,” असं ते म्हणाले.

फडणवीसांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. मतदारयादी तपासणी आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ‘व्होट चोरी’ या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांमध्ये नव्या संघर्षाची सुरूवात होण्याचे संकेत मिळत आहेत.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *