पुणे शहरातील मोक्याच्या जागेवर असलेल्या जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीच्या विक्री प्रकरणावरून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून वंचित समाजातील विद्यार्थ्यांना आसरा देणारी ही जमीन सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने विकल्याचा गंभीर आरोप जैन समाजाकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जैन बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, या प्रकरणाची तातडीने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केला आहे. त्यांनी जैन बांधवांना आंदोलन स्थगित करण्याची विनंती करत, “तुमच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. मी वैयक्तिकरित्या या प्रकरणाकडे लक्ष देईन,” असं आश्वासन दिलं.
तथापि, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या आश्वासनावर नाराजी व्यक्त केली. “आश्वासनं नकोत, जमीनविक्रीचा व्यवहार रद्द झाला तरच आंदोलन थांबवू. दिवाळीनंतर स्टे ऑर्डर घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुण्यात यावं, तेव्हा त्यांचा सत्कार करू,” असा इशारा त्यांनी दिला.
या प्रकरणात आमदार रोहित पवार यांनीही सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “जैन धर्मियांची साडेतीन एकर मोक्याची जमीन हडपण्यात आली आहे. सत्तेचा वरदहस्त असल्याने व्यवहार वेगाने पूर्ण झाला. काही सत्ताधारी नेते आणि त्यांचे नातलग यात थेट सहभागी आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून जैन समाजाला न्याय मिळवून देण्याची मागणी सर्व स्तरांतून होत आहे. जमीन हडपल्याच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसांत या प्रकरणात मोठे घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Leave a Reply