एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या जुहू कॅम्पसवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ या स्टार्टअप कार्यक्रमाचे रविवारी भव्य उद्घाटन करण्यात आले. या वेळी विद्यापीठाच्या प्री-इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले, तसेच वैद्यकीय, कृषी आणि वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रातील तीन नवकल्पनांना गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स कार्यरत आहेत आणि त्यापैकी तब्बल 45 टक्के स्टार्टअप्स महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली आहेत. त्यामुळे महाराष्ट्र खऱ्या अर्थाने भारताची ‘स्टार्टअप राजधानी’ बनला आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, प्रत्येक युवक किंवा युवतीच्या मनातली कल्पना हीच नवकल्पना आहे आणि या स्टार्टअप युगात प्रत्येक व्यक्तीमध्ये उद्योजक होण्याची क्षमता आहे. त्यांनी महिला उद्योजकांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख करत सांगितले की, भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या स्वप्नपूर्तीत महिलांचा वाटा निर्णायक ठरणार आहे.
राज्य सरकारने नुकतेच नवीन स्टार्टअप धोरण मंजूर केले असून, पुढील पाच वर्षांत ५० हजार नवे स्टार्टअप्स निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तसेच, Amazon Web Services सोबत डेटा सेंटर उभारणीसाठी झालेली भागीदारी राज्यातील तंत्रज्ञानाधारित अर्थव्यवस्थेला बळकटी देणार आहे.
‘इनोव्हेशन महाकुंभ 2025’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनींना आणि नवोद्यमींना मार्गदर्शन, निधी व तंत्रज्ञान सहाय्य उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या उद्योजकतेला नवी दिशा मिळून महाराष्ट्रातील स्टार्टअप संस्कृतीला आणखी गती मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.


Leave a Reply