मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘जनसुरक्षा’ला विरोध म्हणजे डाव्यांचेच समर्थन

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘जनसुरक्षा’ कायद्याला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे. जे लोक या विधेयकाचे एकही अक्षर न वाचता विरोध करत आहेत, ते एका प्रकारे जहाल डाव्यांचे समर्थन करत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी नागपूर येथे केले. सरकारविरोधात बोलण्याचा किंवा आंदोलन करण्याचा अधिकार काढून घेण्यात आलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस म्हणाले की, ‘जनसुरक्षा’ कायद्यासंदर्भात लोकशाही पद्धत अवलंबण्यात आली आहे. सर्वपक्षीय नेत्यांची एक समिती बनवून कायद्यावर चर्चा करण्यात आली, त्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या आणि समितीने एकमताने आपला अहवाल दिला. जनतेकडूनही १२ हजार सूचना प्राप्त झाल्या, ज्यानुसार मसुद्यात बदल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ‘जनसुरक्षा’ कायद्यात संघटनेवर बंदी आणल्यानंतरच संबंधित व्यक्तीवर कारवाई करता येईल. एखाद्या व्यक्तीला अटक करायची असल्यास, कायद्यात स्थापन केलेल्या मंडळाकडून परवानगी घ्यावी लागेल. बंदी घातलेल्या संघटनेला ३० दिवसांच्या आत न्यायालयात दाद मागता येईल. मात्र, काही लोक विधेयक न वाचताच विरोध करत आहेत, असे सांगत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता चिमटा काढला.

यावेळी त्यांनी माओवाद्यांच्या रणनीतीवरही प्रकाश टाकला. माओवाद्यांना त्यांच्या कॅडरकडून लोकशाही असलेल्या संघटनांमध्ये घुसून अराजकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला आहे. आता माओवादी कोणत्या संस्थांमध्ये शिरले आहेत, याची माहिती घेतली जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. या कायद्यामुळे कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हिरावून घेतलेला नाही किंवा कोणालाही सरकारविरोधात बोलण्यापासून किंवा लिहिण्यापासून थांबवलेले नाही, असेही त्यांनी अधोरेखित केले.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *