नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आप्पाराव पेठ येथील शेतमजूर दांपत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला, जेव्हा दुबईत काम करणाऱ्या त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना तीन दिवसांनी समजली. श्याम अंगरवार (वय 27) हा आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी दुबईतील इमाद कंपनीत काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याने नोकरी बदलण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, तापामुळे तब्येत बिघडल्याने त्याला दुबईतील एनएमसी रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र 1 ऑक्टोबर रोजी त्याचे निधन झाले.
ही धक्कादायक बातमी त्याच्या कुटुंबाला 4 ऑक्टोबरला मिळाली. अत्यंत गरीब परिस्थितीत असलेल्या या शेतमजूर दांपत्याला मुलाचे पार्थिव भारतात आणण्याची सोय करणे अशक्य झाले. या प्रसंगाची माहिती वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते गोवर्धन मुंडे यांनी 5 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएसद्वारे दिली. संदेश मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने दिल्लीपासून दुबईपर्यंत सूत्रे हलवली. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संपर्क साधून आवश्यक त्या प्रक्रिया सुरू केल्या.
मृत्यूच्या दाखल्यापासून पार्थिव आणण्यापर्यंत सर्व पाठपुरावा मुख्यमंत्री कार्यालयाने केला. खर्चाचा प्रश्न उपस्थित झाल्यावर फडणवीस यांनी वैयक्तिकरित्या तो उचलण्याची तयारी दर्शविली. अखेरीस परराष्ट्र मंत्रालयाने तो खर्च उचलला आणि 12 ऑक्टोबरच्या मध्यरात्री श्यामचे पार्थिव दुबईहून हैद्राबादमार्गे नांदेडला आणण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाने पुढील व्यवस्था करून किनवट येथे अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशील हस्तक्षेपामुळे गरीब शेतमजूर दांपत्याला आपल्या मुलाचे शेवटचे दर्शन घेता आले — ही त्यांच्या आयुष्यातील मोठी दिलासा देणारी घटना ठरली.
Leave a Reply