मुलं तिसरीपासून शिकणार एआय; केंद्र सरकारची मोठी घोषणा

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडविणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. देशातील विद्यार्थ्यांना लहानपणापासून तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी आता तिसरीपासूनच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) शिकविण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच २०२६-२७ पासून या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे.

उच्च शिक्षण मंत्रालयाचे सचिव संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र आणि राज्य सरकारांच्या समन्वयाने देशभरातील सर्व शाळांसाठी नव्याने एआय विषयाचा अभ्यासक्रम तयार केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार विषयाची रचना केली जाईल, जेणेकरून लहान मुलांना एआयचे मूलभूत ज्ञान सोप्या भाषेत समजेल. तिसरीपासून सुरू होणारा हा विषय पुढील वर्गांमध्ये अधिक सखोल स्वरूपात शिकविला जाईल.

सरकारकडून सांगण्यात आले की, हा बदल अंमलात आणण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. अभ्यासक्रमाची निर्मिती, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि डिजिटल अध्ययनसामग्रीची तयारी हे तीन टप्पे एकाचवेळी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशभरातील सुमारे एक कोटी शिक्षकांना या विषयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून ते विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शिक्षण देऊ शकतील.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) सध्या एआय विषयावर आधारित प्राथमिक अभ्यासक्रम तयार करत आहे. यासाठी तज्ज्ञ प्राध्यापक आणि तांत्रिक सल्लागारांचा सल्ला घेऊन एक समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाने डिजिटल अध्ययन सामग्री तयार करण्यासाठी आणि शाळांमध्ये आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी व्यापक योजना आखली आहे.

सध्या सीबीएसईच्या काही शाळांमध्ये सहावी ते बारावीपर्यंत एआयचा विषय प्रायोगिक स्वरूपात शिकविला जात आहे. मात्र आता केंद्र सरकारचा उद्देश हा विषय देशातील सर्व शाळांपर्यंत पोहोचविण्याचा आहे. या निर्णयामुळे भारतीय विद्यार्थ्यांना लहान वयातच तंत्रज्ञान, मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेची ओळख होऊन जागतिक स्तरावरील कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *