चीनने इंटरनेट पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात मोठी झेप घेत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दोन आघाडीच्या कंपन्या हुआवेई आणि चायना युनिकॉम यांनी संयुक्तपणे देशातील पहिलं 10G ब्रॉडबँड नेटवर्क हेबेई प्रांतातील सुनान काउंटीमध्ये अधिकृतपणे कार्यान्वित केलं आहे, अशी माहिती ‘मायड्रायव्हर्स’ या स्थानिक तंत्रज्ञान माध्यमाच्या हवाल्याने ‘अझरन्यूज’ने दिली आहे.
हे अत्याधुनिक नेटवर्क 50G PON (पॅसिव्ह ऑप्टिकल नेटवर्क) तंत्रज्ञानावर आधारित असून, यामुळे इंटरनेटच्या गतीत आणि कार्यक्षमतेत आमूलाग्र सुधारणा होणार आहे.
या नव्या ऑप्टिकल फायबर नेटवर्कमुळे पूर्वी गिगाबिट गतीपर्यंत मर्यादित असलेली सेवा आता दहा गीगाबिट प्रति सेकंद (Gbps) पर्यंत पोहोचली आहे. यासोबतच, नेटवर्क लेटन्सी केवळ काही मिलिसेकंदांवर आणण्यात यश मिळालं आहे, जे जलद डेटा हस्तांतरणासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.
एका प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्रात, या नेटवर्कचा अनुभव घेतलेल्या घरगुती वापरकर्त्याने 9,834 Mbps इतका डाउनलोड स्पीड आणि 1,008 Mbps अपलोड स्पीड नोंदवला. त्याचवेळी फक्त 3 मिलिसेकंद इतकी अल्प लेटन्सी नोंदवली गेली.
ही नव्याने उभारलेली पायाभूत सुविधा केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातही अत्यंत जलद इंटरनेट सेवा पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. परिणामी, चीनमध्ये डिजिटल अंतर कमी होण्यास मदत होईल आणि देशभरातील डिजिटल विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वास तंत्रज्ञान विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.
हुआवेई आणि चायना युनिकॉमचा हा उपक्रम चीनच्या डिजिटल भविष्यासाठी एक दृढ आणि निर्णायक पाऊल मानला जात आहे.


Leave a Reply