जालना : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद आज जालना शहरात उमटले. सकल ख्रिश्चन समाजाच्या वतीने पडळकर यांच्या वक्तव्याविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने ख्रिश्चन बांधव रस्त्यावर उतरले होते, त्यांनी पडळकर यांचे आमदारकी रद्द करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जालना शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला, ज्याला विविध दलित संघटनांनीही पाठिंबा दिला. जोपर्यंत आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात कारवाई होणार नाही, तोपर्यंत विभागीय स्तरावर आणि दिल्लीपर्यंत मोर्चे काढण्याचा इशारा ख्रिश्चन समाजाने दिला आहे.
गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले?
गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथील एका घटनेचा संदर्भ देत ख्रिश्चन धर्मगुरू आणि धर्मांतरावर टीका केली होती. ते म्हणाले, “सांगलीमध्ये ऋतुजा नावाच्या महिलेला धर्मांतर कर म्हणून तिच्यावर दबाव आणला. तिच्या पोटात सात महिन्यांचे बाळ होते. घरात एखादा मोबाईल जरी फुटला तरी ख्रिश्चन पादरी तिच्या नवऱ्याला व सासू-सासऱ्यांना सांगत की ती हिंदू रितीरिवाज पाळते, ही सैतान आहे. त्यामुळे तुमच्या घरात नुकसान होत आहे. ती गर्भवती होती तेव्हा तिच्यावर गर्भसंस्कार हिंदू पद्धतीने नाही तर ख्रिश्चन पद्धतीने करण्यासाठी सासरच्यांनी दबाव निर्माण केला. यातूनच तिने आत्महत्या केली. मी जबरदस्ती करणे योग्य आहे का? या ख्रिश्चन पादरीवर गुन्हा नाही दाखल करायचा का? तुम्ही गावोगावी जाता. फसवता. आमिष दाखवता, तुम्ही लोकांचे धर्मांतरण करता. हे योग्य नाही. ऋतुजा या महिलेचा तुम्ही अशा पद्धतीने खून केला आहे. त्यावर आम्ही भूमिका घ्यायची नाही का?” असा सवाल पडळकरांनी उपस्थित केला.
पडळकर पुढे म्हणाले, “आम्ही हिंदू धर्मातील लोक तुम्हा कोणाला धर्म बदला म्हणून फसवणूक करतो का? आम्ही आमिष दाखवतो का? त्यामुळे तुम्ही गावागावात जाऊन जे उद्योग करता ते बंद करा. गावखेड्यातल्या लोकांना बळी पाडून, आमिष दाखवून त्यांना धर्मांतरण करायला लावताय, हे कसे चालेल? आम्ही धर्माचे रक्षण करण्याच्या भूमिकेमध्ये गावातील सगळ्यांनी राहायला हवं. आम्ही कोणाला धर्मांतरण करण्यासाठी जात नाही, दबाव टाकत नाही, जबरदस्ती करत नाही. त्यामुळे कुणीही गावखेड्यात असे उद्योग करायला येऊ नये. जर अशा पद्धतीने धर्मांतर करण्यासाठी कोणी गावात आला, तर त्याला योग्य प्रकारे उत्तर द्या, ही आमची आज, उद्या आणि कायम हीच भूमिका आहे.”
ख्रिश्चन समाजाची मागणी:
पडळकर यांच्या या वक्तव्यामुळे ख्रिश्चन समाजात तीव्र नाराजी आहे. त्यांचे वक्तव्य धार्मिक भावना दुखावणारे आणि समाजात द्वेष निर्माण करणारे असल्याचे ख्रिश्चन समाजाचे म्हणणे आहे. या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांचे आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा धार्मिक वक्तव्यांवरून राजकीय आणि सामाजिक वातावरण तापण्याची शक्यता आहे. यावर आता सरकार काय भूमिका घेते आणि पडळकरांवर काही कारवाई होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Leave a Reply