दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (World Economic Forum) भारत पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचे प्राबल्य ठळकपणे दिसून आले. या माध्यमातून महाराष्ट्राने विविध उद्योगक्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय दिग्गज कंपन्यांसोबत १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे विक्रमी गुंतवणूक करार केले. यामुळे राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगारांच्या संधी निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच या मंचात सहभागी होण्यासाठी संधी दिल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
मुख्यमंत्र्यांनी दावोस येथे केलेल्या ५४ गुंतवणूक करारांबरोबरच धोरणात्मक सहकार्याचे ७ करार करण्यात आल्याची माहिती दिली. महाराष्ट्र लवकरच डेटा सेंटरसाठीचे प्रमुख केंद्र बनेल, असे सांगून फडणवीस यांनी त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड वाढ होईल, असा त्यांचा अंदाज आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथून दृकश्राव्य प्रणालीद्वारे संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंतही मुंबईतून सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच या मंचावर देशातील अन्य सहा राज्यांबरोबर सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. त्यांनी नमूद केले की, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगभरात भारताबद्दल विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे.
‘कंट्री डायलॉग’ सत्रात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमवेत सहभाग घेतल्याचे सांगत फडणवीस यांनी आपल्या राज्याची ताकद, विकासाच्या संकल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधींविषयी चर्चा केल्याचे नमूद केले. ‘जल सुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य’ या सत्रात त्यांनी जलयुक्त शिवारसह राज्यातील जलसंधारणाच्या उपाययोजनांचे सादरीकरण केले.
फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने यंदा विक्रमी गुंतवणूक करार केले असून, यामुळे राज्याची आणि देशाची ताकद वाढल्याचे दिसते. देशभरातील करारांचे ४०% यशस्वी होण्याचे प्रमाण आहे, परंतु महाराष्ट्रासाठी हेच प्रमाण ६५% आहे. गतवर्षी दावोस दौऱ्यातील ९५% करारांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील गुंतवणुकीच्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. यामुळे देशाची अर्थव्यवस्था विस्तारेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये (AI) महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी विविध करार झाले आहेत. गुगलसोबत ‘एक्सलन्स सेंटर’ उभारण्याचा करार झाला असून, नवी मुंबईत ‘इनोव्हेशन सिटी’ विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. डेटा सेंटर उभारणीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यात यश आले असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासावर भर देताना हरित ऊर्जा, जलसंधारण, आणि स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. २०३० पर्यंत सौरऊर्जेसह अनेक प्रकल्पांमध्ये ५०% योगदान साध्य करण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. दावोस दौऱ्यात महाराष्ट्राने गुंतवणुकीच्या उद्दिष्टांमध्ये विक्रमी यश मिळवले. याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योगमंत्री उदय सामंत, एमआयडीसी आणि इतर विभागांचे अभिनंदन केले.
जपानच्या सुमिटोमी समूहाने महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांमध्ये ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. हे जपान-महाराष्ट्र यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांचे उत्तम उदाहरण असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

CM फडणवीसांच्या प्रयत्नांना मोठं यश; दावोसमध्ये १५.७५लाख कोटींचे सामंजस्य करार
•
Please follow and like us:
Leave a Reply