भाजप आमदारांना मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र: कंत्राटांऐवजी मतदारसंघाच्या हिताला प्राधान्य द्या

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना कंत्राटे आणि टेंडर्सच्या मागे न लागता, मतदारसंघाच्या व्यापक हिताचा विचार करून कामे करण्याचा सल्ला दिला आहे. लोकसभा निवडणुकीतील ‘फेक नरेटिव्ह’चा फटका टाळण्यासाठी आतापासूनच सकारात्मक भूमिका मांडण्याचे आवाहनही त्यांनी केले. बुधवारी रात्री वर्षा बंगल्यावर आयोजित स्नेहभोजनावेळी मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

मतदारसंघाचे हित सर्वोपरी:

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना स्पष्ट केले की, विकासाची कामे करताना मतदारसंघाचे कशात भले आहे, याचा विचार करूनच कामे करावीत. “आपल्या पक्षाचा संस्कार वेगळा आहे, त्यानुसार पुढे जा,” असे त्यांनी सांगितले. आमदार निधीचा योग्य वापर करण्यावरही त्यांनी भर दिला. राज्यासमोर काही महिन्यांसाठी आर्थिक अडचणी असल्या तरी, त्याचा फटका विकासकामांना बसणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले.

फेक नरेटिव्ह’ला प्रत्युत्तर द्या:

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी तयार केलेल्या ‘फेक नरेटिव्ह’मुळे पक्षाला फटका बसल्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. विधानसभेत आपण आक्रमकपणे त्याचा सामना केला. आता पुन्हा आपल्याविरोधात असेच ‘फेक नरेटिव्ह’ तयार करण्याचा प्रयत्न सुरू असून, प्रत्येक आमदाराने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे ते म्हणाले. “त्यांनी फेक नरेटिव्ह तयार करण्यापूर्वीच सरकारच्या आणि पक्षाच्या बाजूने नरेटिव्ह आपल्याला तयार करता आले पाहिजेत,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

पक्षांतराचे स्वागत करा:

इतर पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांबाबत आमदारांनी विरोध न करता स्वागत करण्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पक्ष मजबूत होण्याच्या दृष्टीने याचा फायदाच होणार आहे, असे त्यांनी सांगितले. नाशिक आणि अन्य काही ठिकाणी इतर पक्षांतून नेत्यांना घेण्यास विरोध झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. मतदारसंघासाठी तुमचा आणि पक्षसंघटनेचा शब्दच अंतिम असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्ज व्हा:

मुख्यमंत्र्यांनी आमदारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे निर्देश दिले. बहुतेक ठिकाणी महायुती होईल आणि अपवादात्मक परिस्थितीत अडचणी आल्यास त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. महायुती म्हणूनच निवडणुकांना सामोरे जाणार आहोत हे गृहीत धरून काम करण्याची सूचना त्यांनी केली.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर करा:

केंद्र आणि राज्य सरकारचे निर्णय, तसेच भाजपची कामगिरी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा अत्यंत प्रभावीपणे वापर करण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. स्वतःसह चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांची उदाहरणे देत, त्यांनी आमदारांना सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर किती करतात याचा चार्टही दाखवला. या मार्गदर्शनातून मुख्यमंत्र्यांनी भाजप आमदारांना केवळ प्रशासकीय नव्हे, तर राजकीय आणि वैचारिक पातळीवरही सक्रिय राहण्याचा संदेश दिला.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *