मुंबई – उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. महाविकास आघाडीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने जाधव यांच्या नावाला सहमती दर्शवली. मात्र दुसरीकडे काँग्रेसने उद्धव सेनेची कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचं कारण म्हणजे काँग्रेस ने भास्कर जाधवांच्या नावाला जरी सहमती दर्शवली असली तरी दुसरीकडे विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे.
‘परंपरा आणि नियमानुसार आमची मागणी’ : नाना पटोले
सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद उद्धव सेनेकडे आहे. सेनेचे अंबादास दानवे हे सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. मात्र महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षात विधान परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य आहेत. त्यामुळे काँग्रेसने यापदावर दावा केला आहे. म्हणून उद्धव सेनेची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. परंपरा आणि नियमानुसार आम्ही मागणी करत आहोत, असे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले. तर दुसरीकडे शरद पवार गटाने अडीच-अडीच वर्षे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळावे, असा फॉर्म्युला दिल्याचं सूत्रांकडून कळतंय.
बैठकीत नेमकं काय घडलं?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ ऑगस्टमध्ये पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यानंतर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जावा, असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून मत मांडण्यात आलंय. यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं सांगण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून सतेज पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
मात्र विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचं नाव ठाकरेंच्या शिवसेनेने जाहीर केल्यानंतर काँग्रेस आपलं विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाचे नाव जाहीर करेल असेही सांगण्यात आलंय. सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 20 आमदार, काँग्रेस पक्षाकडे 16 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाकडे 10 आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचे संख्याबळ अधिक आहे.
तर विधान परिषदेचा संख्याबळ पाहता ठाकरेंची शिवसेना सात आमदार आणि काँग्रेस पक्षाचे सुद्धा सात आमदार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचा एका आमदाराचा कार्यकाळ ऑगस्टपर्यंत आहे. त्यामुळे संख्याबळाचा विचार करता काँग्रेस विधान परिषद विरोधी पक्ष नेते पदावर दावा करत असल्याचे बोललं जात आहे.
Leave a Reply