मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसने दावा केला आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत पुढील महिन्यात संपत असल्याने हा बदल अपेक्षित आहे. दानवे यांच्या निवृत्तीमुळे उद्धवसेनेचे विधान परिषदेतील संख्याबळ कमी होणार असून, याच संधीचा फायदा घेत काँग्रेसने अधिक संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सध्या विधान परिषदेत काँग्रेसचे आठ सदस्य आहेत, तर दानवे यांच्या निवृत्तीनंतर उद्धवसेनेचे संख्याबळ सहावर येईल. यामुळे काँग्रेसला शरद पवार गट आणि काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळाल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवणे सोपे होईल, असा काँग्रेसला विश्वास आहे. या पदासाठी काँग्रेसकडून सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सध्या पाटील हे विधान परिषदेत काँग्रेसचे गटनेते म्हणून कार्यरत असून, त्यांच्या नावाला दिल्लीतूनही हिरवा कंदील मिळाल्याचे समजते.
उद्धवसेनेचा पाठिंबा मिळेल का?
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रलंबित ठेवला आहे, कारण एकूण सदस्य संख्येच्या १० टक्के उमेदवार निवडून आलेले नाहीत. उद्धवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र नार्वेकर यांना दिले होते, ज्याला काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. यामुळे विधान परिषदेत काँग्रेसला उद्धवसेनेचा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.
अंबादास दानवे यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २९ ऑगस्ट रोजी संपत आहे. त्यांच्या निवृत्तीमुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त होणार आहे, ज्यावर आता काँग्रेसने आपले दावेदारी सिद्ध करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Leave a Reply