फोनसोबत जोडले, नात्यांपासून तोडले; ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ या सर्वेक्षणातून धक्कादायक निष्कर्ष समोर

मोबाईलमुळे आपल्या जीवनशैलीत मोठे बदल घडले आहेत. भारतीयांच्या झोपेच्या सवयींबाबत आलेल्या एका अहवालात ५८ टक्के भारतीय रात्री ११ नंतर झोपतात, तर ४४ टक्के जण अपुऱ्या झोपेमुळे अस्वस्थ वाटत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘वेकफिट’ संस्थेने प्रकाशित केलेल्या ‘द ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड २०२५’ या सर्वेक्षणातून हे धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. मोबाईलने संपूर्ण जग मुठीत आलं, पण आपल्या हातातून शांतता निसटली, असं म्हणण्याची वेळ आता आली आहे.

मोबाईलचा वापर आता केवळ संवादापुरता राहिलेला नाही, तर तो मानसिक अस्वस्थतेचं मोठं कारण बनत आहे. साध्या व्हॉट्सअॅप ‘ब्लू टिक’पासून ते ‘लाइक्स’च्या संख्येपर्यंत, अनेक गोष्टी मनावर परिणाम करत आहेत. “माझी पोस्ट का बघितली नाही?” “लाइक कमी का आहेत?” असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात आणि नकळत तणाव वाढतो. कोणत्याही पोस्टवर लाइकचा अंगठा दाखवणं म्हणजेच ती पोस्ट वाचली गेली असा गैरसमज अनेकांचा आहे. परंतु, लाइकचा आकडा मोठा दिसल्यावर मन आनंदित होतं, पण त्यामागचा फोलपणा लक्षात येत नाही. विविध इमोजींच्या माध्यमातून भावना व्यक्त करण्याची पद्धत रुजली असली तरी, खरं वाचन आणि संवाद हरवत चालला आहे. मोबाईलवरील अतिरेकाचा फटका आता मुलांना आणि कुटुंबांनाही बसू लागला आहे. पुण्यातील धनकवडी भागात १४ वर्षीय मुलाने मोबाईल पाहण्यास मज्जाव केल्यामुळे आईवरच हल्ला चढवला. त्याने घराच्या खिडक्या फोडल्या, आईला मारहाण केली आणि कात्रीने वार करण्याचाही प्रयत्न केला. शेवटी आईला पोलिसांत तक्रार करावी लागली, ही घटना विचार करायला लावणारी आहे. बालनिरीक्षणगृहात पाठवण्यात आलेल्या त्या मुलाने सुधारणा केली का नाही, हा वेगळा मुद्दा आहे, पण अशा घटना आपल्या घरात घडू नयेत यासाठी आपण काही शिकणार आहोत का? शाळांमध्ये मोबाईल वापरावर बंदी असली, तरी शाळेच्या बसमध्ये मुले मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली दिसतात. यावरूनच त्यांच्या मनात मोबाईलची भूक किती तीव्र आहे, हे स्पष्ट होते.

मोबाईलच्या अतिवापराबाबत अनेकदा चर्चा झाली, मार्गदर्शन झाले, पण या समस्येकडे अजूनही गांभीर्याने पाहिलं जात नाही. समाजात, कुटुंबात, मित्रपरिवारात मोबाईलचा प्रभाव इतका वाढला आहे की, व्यक्तिगत संवाद हरवत चालला आहे. मोबाईल हातात असताना आपण खूप काही जिंकतोय, असं वाटतं; पण प्रत्यक्षात आपण काय गमावत आहोत, याचं भान कुणालाच नाही.

हे वास्तव आता टाळून चालणार नाही. मोबाईल आपल्याला सुविधा देतो, पण त्याच्या आहारी जाणं धोकादायक आहे. वेळेवर यावर नियंत्रण मिळवायचं की मानसिक आरोग्याचा बळी द्यायचा, हा विचार प्रत्येकानेच करायला हवा.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *