मुंबई: देशातील विविध राज्यांचे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबईच्या उलवे येथे ‘पंतप्रधान एकता मॉल’ची उभारणी करण्यात येणार आहे. सिडकोमार्फत हा मॉल बांधला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अनेकांत एकता’ या विचारातून ही संकल्पना पुढे आली असून, प्रत्येक राज्यात असा एक मॉल उभारण्याचे त्यांचे निर्देश आहेत. या प्रकल्पाचा उद्देश देशी उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देणे आणि आर्थिक विकास साधणे हा आहे.
स्थानिक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांना या मॉलमुळे एक हक्काचे व्यासपीठ मिळेल. हा उपक्रम ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांचाच एक भाग आहे.
संरचना आणि नियोजन:
मॉलमध्ये देशभरातील प्रत्येक राज्याच्या आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्या उत्पादनांसाठी स्वतंत्र स्टॉल असतील. या मॉलच्या देखभालीसाठी धोरणे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. वित्त विभाग, ग्रामविकास विभाग, महिला व बाल कल्याण विभाग या विभागांचे प्रधान सचिव तसेच सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक हे या समितीचे सदस्य आहेत. ही समिती पुढील तीन महिन्यांत आपला अहवाल सादर करेल. उलवे येथील मॉलसाठी सिडकोने ५१,००० चौरस फूट जागा निश्चित केली आहे.
पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र:
‘पंतप्रधान एकता मॉल’मुळे पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा आहे. मॉलच्या परिसरात सांस्कृतिक सभागृहही उभारले जाणार आहे. येथे देशभरातील कलावंत आपापल्या कलांचे सादरीकरण करतील. मॉलमध्ये फूड कोर्टही असतील. या मॉलच्या उभारणीसाठी केंद्र सरकार आर्थिक सहाय्य करणार आहे.
Leave a Reply