पुणे : राज्यात सर्वदूर पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर याचा परिणाम आता खरिपाच्या पेरणीवर देखील होऊ शकतो. 18 मेपासून सलग कोसळत असलेल्या वळवाच्या पावसाने शेतकर्यांची दैना उडवून दिली. काही भागात वादळी वारा, मुसळधार पावसाने तांडव घातले. उन्हाळी पिकांवर संक्रांत आली आहे, तर भाजीपाल्याला पावसाचा दणका बसला आहे. शेतामध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे मशागतीची कामे लांबणीवर गेली आहेत. संततधार पावसामुळे खरीप पेरणीपूर्व मशागतीची कामे लांबणीवर पडली आहेत. मशागतीला वेळ मिळाला नाही, तर खरीप लांबणीवर जाऊन उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे.
राज्यातील अनेक भागात धुवाँधार पाऊस कोसळला. अनेक भागात नदी, नाले, बंधारे पाण्याने तुडुंब भरले आहेत. तलावातही बर्यापैकी पाणी आले. अल्प ओलीवरच खरीप पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत 15 एप्रिल ते 30 जूनपर्यंत करण्यात येत असते. त्यामध्ये माती परीक्षण, प्रचार प्रसिद्धी मोहीम, बीज प्रक्रिया, हुमणी अळी प्रात्यक्षिक, फळबाग रोजगार हमी योजनेची तयारी, गाव बैठका घेऊन नवनवीन तंत्रज्ञान शेतकर्यांना सांगणे अशा विविध मोहिमा राबविल्या जातात. परंतु सद्यस्थितीत पाच मेपासून कृषी सहायकांचा संप सुरू आहे. त्यातच कृषी पर्यवेक्षक व कृषी अधिकारी यांच्या संघटना देखील संपात सहभागी झाल्याने शेतकर्यांची सर्व कामे खोळंबली आहेत.
मशागती लांबल्यास जमिनीत वाफसा मिळण्याची शक्यता कमी राहते. परिणामी, बियाण्यांची उगमशक्ती कमी होऊन खरीप हंगामाचे नियोजन कोलमडण्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे. अवकाळी पावसामुळे खरीपाच्या वेळेस योग्य वाफसा मिळेल का, ही चिंता आहे. तर अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातही बियाणे खरेदी करण्याकडे शेतकर्यांनी पाठ दाखविली. ज्यांनी बियाणे खरेदी केली आहेत, त्यांची पेरणी न झाल्यास ती वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Leave a Reply