“बिल्डर लॉबीचा बंदोबस्त करा; सामान्य नागरिकांना न्याय द्या” :मुख्यमंत्र्यांना नागरिकांचे खुले पत्र

पुणे | राज्यातील वाढती बांधकामे, रिडेव्हलपमेंट प्रकल्प आणि बिल्डर लॉबीच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त करत एक नागरिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून सध्याच्या शासन धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “बिल्डरऐवजी सामान्य लोकांवर भरोसा ठेवा,” अशी या पत्रातील भावनिक मागणी असून, त्यात पुण्यातील अनियंत्रित विकास, वाहतूक कोंडी, पाण्याचा तुटवडा आणि पर्यावरणीय ऱ्हास यांचा गंभीर उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रात म्हटलं आहे की, “राज्यातील बहुसंख्य सोसायट्यांना आजही खरेदीखत (कॉन्वेन्स) मिळालेलं नाही. फ्लॅटसाठी कोट्यवधी रुपये देऊनही नागरिक मालक झालेले नाहीत. बिल्डरविरोधात मोफा कायद्यानुसार तक्रार देण्यासाठी नागरिक पोलिसांकडे गेले तरी त्यांची दखल घेतली जात नाही, उलट आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल होतात.”

पुढे नमूद केलं आहे की, पुण्यात रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ४० ते ५० फूट खोदकाम होत असून नैसर्गिक झरे, प्रवाह आणि नद्या नष्ट होत आहेत. “मेट्रो आली म्हणून ४ एफएसआय देऊन गर्दी चारपट वाढवली जात आहे. रस्ते, ड्रेनेज, धरणे, पाण्याची साधनं ही जुनीच आहेत, मग एवढी बांधकामं कशी चालू ठेवता?” असा सवाल पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.

बिल्डर लॉबीच्या वाढत्या प्रभावावर टीका करत पत्रात म्हटलं आहे की, “हे बिल्डर राजकारणी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकल्प उभे करत आहेत. फ्लॅट किंवा पैसा देऊन परवानग्या मिळवल्या जात आहेत. सरकारने या प्रकल्पांची सखोल चौकशी करावी आणि मोफा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.”

शेवटी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे “राज्याचा आणि पुण्याचा ऱ्हास थांबवण्यासाठी” तत्काळ पावले उचलण्याची आणि सामान्य नागरिकांचा आवाज ऐकून त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या हक्कांसाठी केलेलं भावनिक आणि ठाम पत्र सध्या सोशल मीडियावरही चर्चेत आहे.

Please follow and like us:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *