मुंबई : शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मांसाहाराबाबत केलेल्या विधानावरून राज्यात नवीन वादंग पेटला आहे. “मी मांस खाते तर माझ्या पांडुरंगाला चालते” या त्यांच्या विधानावरून भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, वारकरी संप्रदायाची थट्टा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुळे यांनी शनिवारी नाशिक दौऱ्यात माध्यमांशी बोलताना मांसाहाराविषयी स्पष्ट भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, “मी रामकृष्ण हरी वाली आहे. कधी कधी मांस खाते आणि खाल्ले तर माझ्या पांडुरंगाला चालते. माझ्या कुटुंबातील आई, वडील, सासू-सासरे, नवरा सगळे मांसाहार करतात. आमच्या पिढ्यानं खाणं आम्ही लपवत नाही. यात कुणाला काही त्रास होऊ नये.”
त्यांच्या या विधानाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून, विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सुळे यांच्यावर निशाणा साधताना, “सोयीच्या विठ्ठलभक्तीला समर्थन करणाऱ्यांनी वारकरी संप्रदायाची थट्टा केली आहे” अशी टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर प्रतिक्रिया देताना, “सुप्रिया सुळे यांच्या विधानावर आम्ही काही बोलणार नाही. याचे उत्तर महाराष्ट्रातील वारकरीच देतील” असे म्हटले आहे. यापूर्वीही सुप्रिया सुळे या मांस खाऊन मंदिरात गेल्याचा वाद उफाळला होता. त्या प्रकरणातील टीका पुन्हा व्हायरल होताच सुळे यांनी केलेल्या स्पष्टीकरणामुळे वाद अधिक चिघळला आहे.
राज्यात वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव असताना, त्यांच्या भावना दुखावणारे विधान सुळे यांनी केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दुसरीकडे, समर्थकांचा दावा आहे की, सुळे यांनी केवळ आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली आहे आणि त्यात वारकऱ्यांचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. या विधानामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाचा मुद्दा गाजणार, असे संकेत मिळत आहेत.
Leave a Reply