अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने परदेशी विद्यार्थ्यांविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच ठेवला असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी अडकल्याचे समोर आले आहे. या कारवाईमुळे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अमेरिकेतील स्थलांतर वकिलांच्या संघटनेने (एआयएलए) केलेल्या अहवालानुसार ३२७ जणांचे व्हिसा रद्द केल्याच्या प्रकरणातील सुमारे निम्मे म्हणजेच ५० टक्के विद्यार्थी भारतीय आहेत.भारतीय विद्यार्थ्यांनंतर चीनमधील १४ टक्के विद्यार्थी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, नेपाळ आणि बांगलादेश या देशांतील विद्यार्थ्यांचीही नावे या यादीत आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त होत आहे.
अमेरिकन सरकारने २० जानेवारी २०२५ पासून ४७०० हून अधिक परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा व शिक्षण रेकॉर्ड रद्द केले आहेत. मात्र, यासाठी केवळ एआयची मदत घेण्यात आली आहे.
अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसतानाही विद्यार्थ्यांना अडकविण्यात येत आहे. अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना ट्रम्प प्रशासनाने मेसेज पाठवले आहेत. याबाबत भारत सरकार सतर्क असून विद्यार्थ्यांना मदत केली जात आहे.
अमेरिकेने दिला इशारा; कायदा मोडला, तर हद्दपारीचे समोर असू शकते संकट
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टपणे इशारा दिला आहे की, जे विद्यार्थी अमेरिकन कायद्याचे उल्लंघन करतात, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.यात हद्दपारीच्या कारवाईचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मार्गारेट मॅकलियोड यांनी स्पष्ट केले की, कायद्याचे पालन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होईल, परंतु कायदा मोडल्यास त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांसमोर हद्दपारीचे धक्कादायक संकट उभे राहू शकते.
कोणत्या देशात किती भारतीय विद्यार्थी?
– कॅनडा – ४,२७,०००
– अमेरिका – ३,३७,६३०
– ब्रिटन – १,८५,०००
– ऑस्ट्रेलिया – १,२२,२०२
– जर्मनी- ४२,९९७
अमेरिकेतील “पकडा आणि परत पाठवा” या योजनेंतर्गत, ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियावर एआय तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवली जात आहे.
विशेष म्हणजे, ५०% भारतीय विद्यार्थी “ऑप्शनल प्रॅक्टिकल ट्रेनिंग” (OPT) वर असताना काम करत होते, आणि त्यांना थेट बाहेर फेकले जात आहे. यामुळे त्यांचे करिअर, नोकरी आणि स्थायिक होण्याची संधी धोक्यात आली आहे. यावर अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित होत असून, न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे.
Leave a Reply