वनक्षेत्राच्या प्रभावी संरक्षणामुळे अलीकडच्या वर्षांत वन्यप्राण्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र, यासोबतच मानव-वन्यजीव संघर्षाचाही सामना करावा लागत आहे. विशेषतः शेतीपीक नुकसानीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या १७ वर्षांत पीकनुकसानीच्या तब्बल ६,०४,८९६ प्रकरणांची नोंद झाली असून, या नुकसानीसाठी ३११ कोटी ५९ लाख ८१ हजार ६७३ रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.
वन्यजीवांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जागरण करावे लागते. यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. वनखात्याने वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी सौर कुंपण यांसारख्या योजना जाहीर केल्या, मात्र या योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत. परिणामी, वन्यप्राण्यांचा त्रास अद्यापही कायम आहे. वाघ, बिबट्या यांसारखे प्राणी पाणी आणि अन्नाच्या शोधात गावांकडे येतात. त्यांच्या मागावर वाघ आणि बिबटे शेतात दबा धरून बसतात, त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण होते. शासनाकडून नुकसान भरपाई दिली जात असली, तरी ती प्रक्रिया वेळखाऊ आणि गुंतागुंतीची आहे. परिणामी, अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळवण्यात अडचणी येतात.या परिस्थितीत तातडीने तोडगा काढण्याची आवश्यकता असून, वन्यजीवप्रेमी अभय कोलारकर यांनी याबाबत शासनाकडे मागणी केली आहे.
Leave a Reply