नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीनंतर संसदेत आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विरोधी आघाडीचे उमेदवार बी. सुधाकर रेड्डी यांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मतदानाआधीच रेड्डी यांना किमान ३१५ मते मिळतील, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांना केवळ ३०० मते मिळाली. यामुळे १५ मते नेमकी कुठे गेली, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. लभाजपने या घडामोडीचा फायदा घेत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. भाजपचे म्हणणे आहे की, विरोधी पक्षातील १५ खासदारांनीच क्रॉस व्होटिंग केली असून त्यामुळे निकालात बदल झाला. या संदर्भात महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमधील काही खासदारांवर विशेष संशय घेतला जात आहे.
क्रॉस व्होटिंगच्या या प्रकरणामुळे इंडिया आघाडीच्या ऐक्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. विरोधकांकडून अजून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नसली, तरी पाठीमागे मतभेद असल्याचे संकेत मिळत आहेत. महाराष्ट्रातील काही खासदारांनी स्थानिक राजकीय दबावाखाली क्रॉस व्होटिंग केली असल्याची चर्चा रंगली आहे, तर केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रादेशिक समीकरणांचा परिणाम झाल्याचे विश्लेषण पुढे येत आहे. मतदान गुप्त असल्याने नेमके कोणत्या खासदारांनी विश्वासघात केला हे सिद्ध करणे कठीण आहे. तरीदेखील, १५ मतांचा फरक हा विरोधी आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. संसदेत त्यांच्या एकजूटीबद्दल आता शंका निर्माण झाल्या आहेत. राजकीय तज्ज्ञांच्या मते, या निकालामुळे फक्त उपराष्ट्रपती निवडणुकीवरच नव्हे, तर आगामी संसदीय रणनीतीवरही परिणाम होऊ शकतो. भाजपने इंडिया आघाडीतील मतभेद अधोरेखित करून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा राजकीय फायदा घेण्याची तयारी सुरू केली आहे.
Leave a Reply