मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दादरमधील ऐतिहासिक कबुतरखाना अखेर पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. महापालिकेने तातडीने कारवाई करत परिसर सील केला असून पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे कबुतरांची संख्या लक्षणीयरीत्या घटल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून कबुतरखान्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर अनेक वेळा तक्रारी होत होत्या. कबुतरांची विष्ठा, त्यातून पसरणारे जीवाणू व फुफ्फुसांवर होणारा परिणाम लक्षात घेता न्यायालयाने दाणे टाकण्यास मनाई केली होती. परिणामी कबुतरांची संख्या कमी झाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे.
दादर परिसरात दोन ते तीन दाणेविक्रेते कबुतरांना खाऊ घालण्यासाठी वर्षानुवर्षे व्यवसाय करत होते. मात्र, बंदी लागू झाल्यामुळे त्यांनाही गाशा गुंडाळावा लागला आहे. दाणे विक्री बंद झाल्याने या विक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असला तरी सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. जैन समाजातील काही सदस्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कबुतरांना अनावश्यक दाणे घातल्यामुळे त्यांची संख्या वाढते आणि त्याचा थेट परिणाम पर्यावरण व मानवी आरोग्यावर होतो. मात्र, कबुतरांना नियंत्रित प्रमाणात दाणे टाकण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही समोर आली आहे.
महापालिकेच्या पथकाने आता कबुतरखाना परिसरात नियमित गस्त वाढवली असून कोणीही कबुतरांना दाणे घालू नये, यासाठी कडक नजर ठेवली जात आहे. पोलिस व्हॅन देखील तेथे कायम तैनात आहे. कबुतरांमुळे फुफ्फुसांचे विकार, त्वचेचे आजार आणि संसर्गजन्य त्रास वाढतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून कबुतरखाना बंद करणे हा आरोग्यासाठी महत्त्वाचा निर्णय ठरला आहे.
Leave a Reply